संग्रहित छायाचित्र
चिंचवड विधानसभा मतदारसंघात जगताप कुटुंब आणि राहुल कलाटे या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये चौथ्यांदा लढत होत आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर होत असलेल्या हि पहिल्या सार्वत्रिक निवडणुकी आहे. यावेळी रिंगणात उतरलेले त्यांचे बंधू शंकर जगताप आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून राहूल कलाटे यांच्यात दुरंगी लढत झाली आहे. त्यामुळे जगताप यांच्यापुढे बालेकिल्ला राखण्याचे आव्हान तर राष्ट्रवादी आणि कलाटे यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार, याबाबत कार्यकर्त्यांसह मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात १०१ ठिकाणांवर एकूण ५६४ मतदान केंद्र करण्यात आली. त्यात एकूण ६ लाख ६३ हजार ६२२ मतदार होते. या मतदारांमध्ये ३ लाख ३८ हजार ४५० पुरूष, ३ लाख १५ हजार ११५ महिला व ५७ इतर मतदार आहेत. त्यानूसार सकाळी ७ ते ६ वाजेपर्यंत ३ लाख ८७ हजार ५२० मतदारांनी मतदान केले असून एकूण ५८.३९ टक्के इतके मतदान झाले आहे. त्यात २ लाख ३ हजार ७८१ पुरुष मतदार तर १ लाख ८३ हजार ७२४ महिला मतदार आहेत. त्यामुळे यामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत ३ लाख ३१ हजार ८६१ व इतर १५ मतदारांनी मतदान केले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे, भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात तगडी लढत होत आहे. तर अपक्ष ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यासह इतर २१ उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून जनतेचा कौल कोणाला मिळणार हे पाहावे लागणार आहे.
राज्यातील सर्वाधिक मतदार असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात २०१९ साली सर्वाधिक ५६.३० टक्के इतके मतदान झाले होते. दिवगंत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर २०२३ साली झालेल्या पोटनिवडणुकीतही या मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आसपास होती. या मतदारसंघात मोठ्या वेगाने मतदारसंख्या वाढत असताना मतदानाची टक्केवारी मात्र वाढताना दिसत नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघावर जगताप कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व राहिलेले आहे. २००८ मध्ये राज्यात मतदारसंघांची पुनर्रचना झाली. चिंचवड मतदारसंघ अस्तित्त्वात आला. २००९ मध्ये चिंचवडमध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हापासून हा मतदारसंघ जगताप कुटुंबाकडे आहे. लक्ष्मण जगताप तीन वेळा चिंचवडमधून विजयी झाले. त्यांच्या निधनानंतर २०२३ मध्ये पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी बाजी मारली.
२००९ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी ७८ हजार ७४१ मतं मिळवत चिंचवडमधून बाजी मारली. त्यावेळी ते अपक्ष लढले होते. त्यांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणेंचा जवळपास साडे सहा हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हा काँग्रेसचे उमेदवार मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर राहिला. मुख्य लढत जगताप विरुद्ध बारणे अशीच झाली.
२०१४ मध्ये राज्यात मोदी लाट होती. वातावरण भाजपच्या बाजूने होतं. लक्ष्मण जगताप भाजपच्या तिकिटावर लढले आणि सहज विजयी झाले. त्यावेळी शिवसेना-भाजपची युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटल्यानं सगळे पक्ष स्वबळावर लढले. जगताप यांनी १ लाख २३ हजार ७८६ मतं मिळवली. तर सेनेच्या राहुल कलाटे यांना केवळ ६३ हजार ४८९ मतं मिळाली. जगताप यांनी जवळपास ६० हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा विधानसभा गाठली.
२०१९ मध्ये लक्ष्मण जगताप यांनी १ लाख ५० हजार ७२३ मतं घेतली. ते विजयी झाले. २०१४ मध्ये सेनेच्या तिकिटावर लढलेले राहुल कलाटे २०१९ मध्ये अपक्ष लढले. त्यांनी बंडखोरी केली. कलाटे यांनी १ लाख १२ हजार २२५ मतं घेतली. त्यांचा ३८ हजार ४९८ मतांनी पराभव झाला. २००९, २०१४, २०१९ मध्ये विजयी होत हॅट्ट्रिक करणाऱ्या जगताप यांचं ३ जानेवारी २०२३ मध्ये निधन झालं. त्यामुळे मतदारसंघात पोटनिवडणूक लागली.
भाजपनं जगताप यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी दिली. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं विठ्ठल काटेंना तिकीट दिलं. जगताप यांना १ लाख ३५ हजार ६०३ मतं मिळाली. तर काटे यांना ९९ हजार ४३५ मतदान झालं. राहुल कलाटे यावेळीही अपक्ष लढले. यावेळी त्यांना ४४ हजार ११२ मतं पडली. जगताप ३६ हजार १६८ मतांनी विजयी झाल्या. महाविकास आघाडीनं तिकीट नाकारल्याने कलाटेंनी बंडखोरी केली. त्यांच्यामुळे मतविभाजन झालं. याचा फटका काटेना बसला. ते पराभूत झाले.
दरम्यान, २०२४ च्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत पुन्हा पारंपारिक विरोधक एकमेकांसमोर उभे राहिले आहेत. यावेळी भाजप, राष्ट्रवादी (एपी), शिवसेना (शिंदे) गट महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप आणि शिवसेना (उबाठा) काॅग्रेस, राष्ट्रवादी (एसपी) गटाचे मविआचे अधिकृत उमेदवार राहूल कलाटे यांच्यात खरी लढत झाली. पण, अपक्ष म्हणून राष्ट्रवादीचे बंडखोर ज्येष्ठ माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे देखील मैदानात होते. त्यामुळे जगताप-कलाटे यांच्यात खरी लढत झाली तरीही भोईर कोणाची मते घेणार, यावरुन चिंचवडला कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला लागली आहे.