संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत एकूण आठ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातील पिंपरी, भोसरी, चिंचवड हे तीन्ही मतदारसंघ संपूर्णपणे आयुक्तालयाच्या हद्दीत आहेत. तर, मावळ, भोर, वडगाव शेरी, खडकवासला आणि खेड - आळंदी या मतदार संघातील काही भाग पोलीस आयुक्तायलयाच्या हद्दीत आहेत. यातील सर्व मतदारसंघातील ठरावीक मतदान केंद्रांना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भेट देत पाहणी केली.
विधासभेची निवडूक भयमुक्त आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावी यासाठी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सुरुवातीपासून सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केले आहे. मतदारसंघातील गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, पोलीस बंदोबस्त वाढविणे, गस्त वाढविणे, साध्या वेशातील पोलीस तैनात करणे, नागरिकांशी संवाद साधणे, त्याच्या अडचणी समजावून घेणे, नागरिकांना कोणाकडून धमकी किंवा दबाव टाकण्यात येत आहे का, याची माहिती घेणे अशी सर्व प्रकारची खबरादारी पोलिसांनी घेतली आहे. त्यातच एक भाग म्हणून बुधवारी (२० नोव्हेंबर) पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेट देत पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, विशाल गायकवाड, शिवाजी पवार, विवेक पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.
मावळ मतदारसंघातील तळेगाव दाभाडेयेथिल वीर जिजामाता प्राथमिक कन्या शाळा, संत ज्ञानेश्वर प्रथामिक शाळा तसेच नुतन महाविद्यालय येथे पोलीस आयुक्तांनी भेट दिली. भोसरी मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय, पीसीएमसी पब्लिक प्राथिमक शाळा येथे पोलीस आयुक्त चौबे यांनी भेट दिली. चिंचवड मतदारसंघातील फत्तेचंद जैन विद्यालय येथे भेट देऊन पोलीस बंदेबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.