संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेतील (वायसीएम) काही अभ्यासक्रमांच्या जागा वाढवण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे येथील डॉक्टरांची संख्या वाढणार आहे.
महापालिकेचे वायसीएम रुग्णालय हे शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहे. या रुग्णालयामध्ये ७५० खाटांची सोय आहे. तसेच, विविध अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा या रुग्णालयात देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांबरोबरच शहराबाहेरूनदेखील येथे नागरिक उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे या रुग्णालयावर अधिकचा ताण आहे. त्या तुलनेत डॉक्टरांची कमतरता जाणवते. ही कमतरता भरून काढण्यासाठी रुग्णालयामध्ये सध्या सुरू असलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या जागा वाढवण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. मेडिकल काउंसिल ऑफ इंडियाची त्याला मंजुरी मिळाल्यानंतर आपोआपच या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांची संख्यादेखील वाढणार आहे. या प्रस्तावाला वर्षभरात मंजुरी अपेक्षित आहे, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
नर्सिंग महाविद्यालय होणार सुरू
वायसीएम रुग्णालयामध्ये बीएस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरू करण्यासाठी राज्य सरकारने २०२४ मध्ये तत्त्वतः मंजुरी दिली आहे. रुग्णालयाच्या आवारातील नवीन इमारतीत तिसऱ्या मजल्यावर हे महाविद्यालय सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमासाठी ६० जागा असणार आहेत. नर्सिंग महाविद्यालयामुळे रुग्णालयातील परिचारिकांच्या संख्येत वाढ होणार आहे.