सायकल ट्रॅक की अडथळ्यांची शर्यत?

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध रस्त्यांवर स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट या प्रकल्पातून सायकल ट्रॅक तयार केल्याचा दावा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात हे ट्रॅक सुरक्षित व सलग नाहीत. सायकल ट्रॅकवर वाहनांचे पार्किंग, अतिक्रमण, राडारोडा यांसारखे अनेक अडथळे असतात.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 06:26 pm

संग्रहित छायाचित्र

एकसलग नसल्याने करावा लागतो अनेक अडथळ्यांचा सामना, अनेक प्रकल्पांत सायकल ट्रॅक केल्याचा पालिकेचा दावा पोकळ

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून विविध रस्त्यांवर स्मार्ट सिटी, अर्बन स्ट्रीट या प्रकल्पातून सायकल ट्रॅक तयार केल्याचा दावा केला जातो. परंतु, प्रत्यक्षात हे ट्रॅक सुरक्षित व सलग नाहीत. सायकल ट्रॅकवर वाहनांचे पार्किंग, अतिक्रमण, राडारोडा यांसारखे अनेक अडथळे असतात. त्यामुळे ट्रॅकवरून सायकलस्वारांना सायकल चालवता येत नाही. आम्हालाही शहरात सायकल चालवायची आहे, पण सायकल ट्रॅकवर निर्माण होणाऱ्या अडथळ्यांचे काय, असा सवाल सायकलस्वारांकडून उपस्थित केला जातो.

शहरात ४५ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर स्वतंत्रपणे सायकल ट्रॅक बनवण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी कमी रुंदीचे रस्ते आहेत. तेथे लाल रंगाचे पट्टे तयार करून ‘सायकल ट्रॅक’ तयार करण्यात आले आहेत. शहरात विविध रस्त्यांवर एकूण ३८ किलोमीटर सायकल ट्रॅक तयार झाले आहेत. त्यावर कोट्यवधी रुपये खर्च झाला आहे, तर अंदाजे ४० किलोमीटर सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे. काही सायकल ट्रॅक महापालिकेने अर्बन स्ट्रीट रस्त्यांवर केले असून काही स्मार्ट सिटी कंपनीने केले आहेत.

तसेच, आणखी काही रस्त्यांवर ट्रॅक बनवण्यात येणार आहेत. परंतु, सायकल ट्रॅक एकसलग नसल्याने अनेक अडथळ्यांचा सामना सायकल चालवताना करावा लागतो. सायकल ट्रॅकवर मध्येच झाड, बाके, कठडा, डिपी बॉक्स, दिव्याचा खांब, पार्क केलेले वाहन, विक्रेते, दुकानदारांचे साहित्य, राडारोडा, कचऱ्याचे ढीग, नामफलक, तुटलेले चेंबरचे झाकण, तुटलेले केबल, उघड्या वीजवाहक केबल, अतिक्रमण असे असंख्य अडथळे आहेत. त्यामुळे सायकलस्वारांना सुरक्षितपणे सायकल चालविता येत नाही. परिणामी, सायकल ट्रॅकसाठी केलेला कोट्यवधी खर्च पाण्यात गेल्याचे चित्र आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यात अनेक लहान-मोठे अपघात होतात. त्या कारणांमुळे सायकल ट्रॅक असूनही ते सायकल चालविण्यासाठी उपयुक्त ठरत नाहीत.

शहरातील सायकल ट्रॅकची अवस्था अतिशय गंभीर आहे. विशेष म्हणजे प्रशासन किंवा राजकीय मंडळी यांचे कोणाचेही याकडे लक्ष नाही. सायकल ट्रॅक पुणे विद्यापीठ येथे स्वतंत्र फुटपाथच्या बाजूला बांधलेला आहे. त्याच्यावर कोणतेही वाहन जाऊ शकत नाही.  त्याप्रमाणे शहरात सायकल ट्रॅकची रचना गरजेची आहे. शहरामध्ये महापालिकेने फक्त रोडच्या बाजूला लाल पट्टे मारून सायकल ट्रॅक असे फलक लावले आहेत. त्यावर सर्रास चारचाकी वाहनांचे पार्किंग, अतिक्रमण होते. पालिकेने याकडे  लक्ष दिले पाहिजे. बेंगलोरच्या धर्तीवर फुटपाथवरच ग्रीन पट्टा मारण्यात यावा.

- गजानन खैरे, अध्यक्ष - इंडो ॲॅथलेटिक सोसायटी

नागरिकांनी पायी किंवा सायकलवर प्रवास करावा म्हणून महापालिका सुरक्षित असे ‘सायकल ट्रॅक’ व पादचारी मार्ग तयार करीत आहे. एकूण ३८ किलोमीटर सायकल ट्रॅक तयार झाले असून अंदाजे ४० किलोमीटर सायकल ट्रॅकचे काम सुरू आहे. नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावर सायकलस्वारांकडून वापर केला जातो. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी नागरिकांनी सायकल वापरावी, यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. अतिक्रमण व वाहनांवर वेळोवेळी कारवाई होत आहे.

- बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

 

शहरात कोणत्या रस्त्यांवर ‘सायकल ट्रॅक’?

सांगवी फाटा ते साई चौक

नाशिक फाटा ते वाकड

काळेवाडी फाटा ते एम. एम. स्कूल

चिंचवड गाव ते वाल्हेकरवाडी चौक

केएसबी चौक ते कुदळवाडी

एम्पायर इस्टेट ते ऑटो क्लस्टर चौक

निगडी भक्ती-शक्ती चौक ते रावेत पूल

पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव

‘बायसिकल शेअरिंग’ उपक्रमही झाला बंद

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीने शहरातील २०० पेक्षा अधिक ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरिंग’ उपक्रम राबवला होता. अनेक स्मार्ट सायकली चौका-चौकांत उपलब्ध करून दिल्या होत्या. स्मार्ट मोबाइलद्वारे तासाचे १० रुपये भाडे भरल्यानंतर त्या सायकली चालवण्याची सोय होती. परंतु, त्या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. काही सायकलींची तोडफोड करण्यात आली. तर काही सायकली चोरीस गेल्या. त्यामुळे तो उपक्रम काही महिन्यांतच गुंडाळण्यात आला. सायकल चालवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेने सुरू केलेले इतर उपक्रमही बंद आहेत.

Share this story

Latest