Pimpri-Chinchwad: विनापरवाना कुत्री पाळणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

पिंपरी-चिंचवड शहरात फक्त तीनशे नागरिकांनी आपल्या महापालिकेचा रितसर परवाना घेऊन कुत्री पाळलेली आहेत. मात्र शहरात आजमितीस सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिकांनी विनापरवाना कुत्री पाळलेली आहेत. त्या विनापरवाना पाळलेल्या कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 15 Jan 2025
  • 04:39 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदन

पिंपरी-चिंचवड शहरात फक्त तीनशे नागरिकांनी आपल्या महापालिकेचा रितसर परवाना घेऊन कुत्री पाळलेली आहेत. मात्र शहरात आजमितीस सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिकांनी विनापरवाना कुत्री पाळलेली आहेत. त्या विनापरवाना पाळलेल्या कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यांना वेळोवेळी लसीकरण केले जात नाही. अशी कुत्री चावल्यास रेबीज होतो व नाहक नागरिकांचा जीव जातो. त्यामुळे अशा विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी वंचित उत्थान व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन केली आहे.

विनापरवाना घरे बांधणारे, विनापरवाना नळ कनेक्शन जोडणारे यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाते. तोच नियम या विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांना लावून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे पत्रात म्हटले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टीत नागरिकांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, तरीही घरात कुत्री पाळली जातात व घरात पुरेशी जागा नसल्याने ती कुत्री रस्त्यांवर सोडली जातात. तसेच त्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यांचे वेळेवर लसीकरण केले जात नाही. हीच परिस्थिती चाळीत व घरकुल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीत आहे. राहायला जागा कमी असताना तिथे कुत्री पाळली जातात, त्यांच्या गळ्यात पट्टा बांधला जात नाही. घरात जागा नसल्याने त्यांना बाहेर रस्त्यावर मोकळे सोडले जाते मग त्या कुत्र्यांच्या  झुंडी तयार होतात. त्याचा नागरिकांना त्रास होतो. तरी सदर विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागितली जाईल, असेही या निवेदनात म्हटले आहे.

Share this story

Latest