चौका-चौकातील अनधिकृत रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहराच्या विविध भागात, विनापरवाना, अनधिकृतपणे आणि अनियंत्रितपणे रिक्षा स्टॅण्ड उभे राहिले आहेत. यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 14 Jan 2025
  • 06:22 pm

संग्रहित छायाचित्र

वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, मोरवाडी, पिंपरी चौकात प्रचंड त्रास

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. शहराच्या विविध भागात, विनापरवाना, अनधिकृतपणे आणि अनियंत्रितपणे रिक्षा स्टॅण्ड उभे राहिले आहेत. यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः मेट्रोच्या फीडर सेवेसाठी केवळ मोजक्याच रिक्षांना परवानगी देण्यात आली असताना, शहरातील मोरवाडी चौक, नाशिक फाटा, वल्लभनगर परिसरात अनधिकृत रिक्षा स्टॅण्ड्सचे पेव फोफावले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक विभाग आणि आरटीओच्या दुर्लक्षामुळे रस्ते अडवणाऱ्या या रिक्षा स्टॅण्ड्सने वाहतूक कोंडी वाढली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा यांच्याकडून यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. नागरिकांच्या तक्रारी असूनही ही परिस्थिती कायम आहे. शहरातील वाढती वाहतूक समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना होण्याची गरज आहे.

मेट्रो प्रवाशांसाठी पीएमपीएमएलसह रिक्षांची देखील फीडरसेवा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी मेट्रोच्या प्रत्येक थांब्यावर काही शेअर रिक्षांची सेवा सुरू करण्यात आली. प्रत्येक थांब्यावर किती रिक्षा वाहतूक करतील यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने शहरातील रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ही संख्या ठरवली होती.

त्यानुसार, प्रत्येक थांब्यावर मोजक्याच शेअर रिक्षांना परवानगी देण्यात आली. मात्र या नियमांचे उल्लंघन होऊन त्या त्या ठिकाणी शहरात आता बेकायदेशीर रिक्षा स्टॅण्ड उभारले गेले. आता त्यामुळे तेथील रहदारीची कोंडी होत वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सामान्य नागरिकांना दररोज याचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मुख्य चौकापासून किमान ७५ मीटर अंतरावर बस अथवा रिक्षा  स्टॅण्ड असले पाहिजे. यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहू शकते. मात्र, शहरात या नियमांचे सर्रास उल्लंघन झालेले दिसून येत आहे.

चौका-चौकातील अनधिकृत रिक्षा स्टॅण्डमुळे वाहतूक कोंडी

मोरवाडी चौकात झालेल्या मेट्रोच्या थांब्यामुळे रिक्षा स्टॅण्ड उभे राहिले आहेत. रस्त्यावरच उभ्या केलेल्या रिक्षांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे सिग्नल, तर दुसरीकडे रस्त्यावर आलेली रिक्षांची रांग तसेच चौकातील दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या चारचाकी गाड्या सर्रासपणे रस्त्यावर उभ्या असतात. पोलीस थातूरमातूर कारवाई करतात. गर्दीतून मार्ग काढताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मनस्ताप होत आहे.

Share this story