संग्रहित छायाचित्र
पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या ३२२ बस या जुन्या झाल्या आहेत. परिणामी, त्या बस स्क्रॅप कराव्या लागणार आहेत, तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नव्या बस फेब्रुवारीपासून ताफ्यात दाखल होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, नवीन बस सेवेत दाखल होत नाही तोपर्यंत या भंगार बस मार्गावर नेण्याची नामुष्की पीएमपीएमएल प्रशासनावर आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या बस अजूनही मार्गावर सोडण्यात येतात. या नव्या वर्षात जुन्या बसच्या संख्येमध्ये आणखी भर पडली आहे. सद्यस्थितीमध्ये तब्बल ३२२ जुन्या, जीर्ण झालेल्या व भंगारवस्थेत असलेल्या या बस आहे. मात्र नवीन बस येत नसल्याने या बस मार्गावर चालवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पीएमपीएमएल प्रशासनाने ठेकेदारामार्फत ४०० बस आणि स्वमालकीच्या २०० सीएनजी अशा ६०० बस घेण्याचा निर्णय घेतला. या बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून या दोन्ही प्रकारच्या बस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामधील ठेकेदारामार्फत घेण्यात येणाऱ्या ४०० बसची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे.
या बस फेब्रुवारीपासून दाखल होण्यास सुरुवात होणार आहेत. या ४०० बस टप्प्या-टप्प्याने येणार आहेत. तसेच, स्वमालकीच्या २०० सीएनजी बसची निविदा प्रक्रियाही नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. या बस टाटा कंपनीकडून घेतल्या जाणार आहेत. त्यादेखील मार्च अखेरपासून टप्प्या-टप्प्याने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्याची तारीख गेल्या कैक महिन्यांपासून वाढत जात आहे. त्यामुळे जुन्या व रस्त्यात बंद पडलेल्या बस दुरुस्त करून पुन्हा-पुन्हा प्रवाशांसाठी वापरल्या जात आहेत.
ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढले
पीएमपीएमएलकडे १२ वर्षे जुन्या झालेल्या स्वमालकीच्या काही बस सध्या चालवल्या जात आहेत. त्यामुळे रस्त्यामध्ये ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, जशा नवीन बस येण्यास सुरुवात होतील, त्यानुसार जुन्या बस बाद करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा प्रकारदेखील कमी होऊन प्रवाशांना चांगल्या बसमधून प्रवास करता येईल, अशी माहिती देण्यात आली. पीएमपीच्या ताफ्यात येणाऱ्या एकूण ६५० बसपैकी अद्यापही १६० ई-बस ताफ्यात दाखल झालेल्या नाहीत. त्या बस पुढील महिन्यात दिल्या जातील, असे संबंधित कंपनीकडून पीएमपीएमएलला वारंवार सांगितले जात आहे. परंतु, बस काही ताफ्यात दाखल होताना दिसत नाहीत. या बस दोन वर्षांपूर्वीच ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते.
नवीन बस मिळवण्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे प्रवाशांनादेखील चांगल्या प्रकारे वाहतूक सुविधा देण्यात येतील.
- राजेश कुदळे, मुख्य अभियंता