संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात साधारण २४ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शासकीय व अनुदानित शाळेतील ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये आहेत. त्यामुळे, त्यांना शासनाकडून गणवेश अथवा पाठ्यपुस्तकांच्या अनुदानापासून वंचित राहावे लागत आहे. याशिवाय, पाठ्यपुस्तक वाटपाचा ताळमेळ लागत नसल्याने काही शाळांना पाठ्यपुस्तके कमी पडत आहेत.
एकाच विद्यार्थ्याचे दुसर्या शाळेतही नाव असणे, कुटुंबाच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे काम करावे लागणे, शिकण्यात निरुत्साह, पालकांचे दुर्लक्ष या कारणांमुळे जास्त काळ गैरहजर असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत ’शालाबाह्य विद्यार्थी’ समजण्यात येते. अनेकदा त्यांना शाळेच्या पटावरून कमी करून ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये वर्ग केले जाते. मात्र, बहुतांश विद्यार्थी इतरत्र शिक्षण घेत असतात. तरीही ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये त्यांची नोंद शासनाकडे असते. परिणामी, अशा विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश किंवा पाठ्यपुस्तक अनुदान मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड कार्यक्षेत्रातील शाळांमध्ये ‘ड्रॉप बॉक्स’ मधील विद्यार्थी कमी करण्यासाठी शाळा स्तरावरून योग्य प्रयत्न करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने केली आहे.
‘ड्रॉप बॉक्स’मधील विद्यार्थी प्रत्यक्ष कोणत्या तरी शाळेत शिक्षण घेत असल्याने त्यांना पाठ्यपुस्तके दिली जातात. मात्र, केंद्र शासनाकडून पाठ्यपुस्तकांचे अनुदान प्राप्त होताना ‘ड्रॉप बॉक्स’मधील विद्यार्थ्यांचे गणवेश किंवा पाठ्यपुस्तक अनुदान मिळत नाही. त्याने पाठ्यपुस्तक वाटपाचा ताळमेळ लागत नाही. काही शाळांना पाठ्यपुस्तके कमी पडत आहेत. जोपर्यंत ड्रॉप बॉक्समधील विद्यार्थी कमी होणार नाहीत, तोपर्यंत केंद्र शासनाकडून नवीन विद्यार्थ्यांना ‘यू-डायस’मध्ये प्रवेश देण्यास टॅब मिळणार नाही. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सुमारे २४ हजार विद्यार्थी ‘ड्रॉप बॉक्स’मध्ये गेले आहेत. ते पटसंख्येत दिसत असले तरीही त्यांना वारंवार गैरहजर राहिल्याने शालेय साहित्य मिळत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागत आहे.
सतत गैरहजर विद्यार्थी ’ड्रॉप बॉक्स’मध्ये
शाळेत एखादा विद्यार्थी सलग एक महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर असल्यास अशा विद्यार्थ्याला शाळेच्या पटावरून कमी करण्यासाठी स्टुडंट पोर्टल’मध्ये ’ड्रॉप बॉक्स’मध्ये टाकण्याची सुविधा देण्यात आली आहे. सतत, गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांस ’ड्रॉप बॉक्स’मध्ये घालणे बंधनकारक आहे. विद्यार्थी काही काळाने पुन्हा हजर झाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुन्हा प्रणालीमध्ये घेण्यासाठी ‘ड्रॉप बॉक्स’मधून अटॅच करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
परप्रांतीय आणि स्थलांतरित विद्यार्थी शाळा सोडून गेल्यावर दाखला काढून नेत नाहीत. त्यामुळे असे विद्यार्थी ट्रेस होत नाहीत. तसेच त्यांना परस्पर काढून टाकता येत नाही. तसेच जे दहावी व बारावी पास विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी काढले तर हा आकडा कमी होणार आहे. त्या मुख्याध्यापकांची बैठक घेऊन अडचणी समजून घेतल्या जातील. आवश्यक त्या सूचना करण्यात येतील.
- संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग