प्रातिनिधिक छायाचित्र....
निर्बीजीकरणानंतरही पिंपरी-चिंचवडमध्ये वाढली मोकाट कुत्र्यांची संख्या
Pimpri-Chinchwad : निगडी प्राधिकरण, आकुर्डीसह पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांमध्ये भटक्या श्वानांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या श्वानांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. लहान मुलांपासून ज्येठ नागरिकांवर ते हल्ले करत असून यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे.
निगडी प्राधिकरण, आकुर्डी, मोहननगर, काळभोरनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुराम, आनंदनगर, इंदिरानगर आदी परिसरात मोकाट श्वानांचा वावर वाढल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांकडून महापालिकेला येत आहेत. या भागांमध्ये भटक्या श्वानांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे परिसरातील लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. अनेक गल्ल्यांमध्ये, चौकांमध्ये तसेच मुख्य रस्ते, भाजीपाला मार्केट, चिकन, मटणची दुकाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानांचा वावर वाढला आहे.
अनेकदा रात्रीच्या सुमारास ही कुत्री कळपाने अंगावर येतात. गाडीच्या पाठीमागे धावतात. भटक्या श्वाानांकडून चावा घेणे, हल्ला करणे अशा घटनादेखील सातत्याने घडत आहेत. त्यामुळे अशा श्वानांना पकडून महापालिका प्रशासनाने बंदिस्त करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पिसाळलेल्या श्वानांच्या संख्येतही वाढ होत आहे. परिसरातील लहान बालके रस्त्यावर खेळत असताना अनेक वेळा हे श्वान त्यांच्यावर धावून जात आहेत. मोकाट श्वानांच्या भीतीने विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, कामगार यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट श्वान रात्रीच्या वेळेत खूप जोरजोरात भुंकतात. त्यामुळे रात्रीच्या वेळेत नागरिकांचा निद्रानाश होतो. लहान मुले घाबरून जागी होतात. हे मोकाट श्वान लहान मुले, महिलांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
"कायद्याने श्वानकडून त्याला मारून टाकणे गुन्हा आहे. त्यामुळे भटके श्वान पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. एका श्वानावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर चार दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येते. त्यांच्या मूळ अधिवासात सोडले जाते."
- संदीप खोत, उपायुक्त, पशुवैद्यकीय विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
तसेच कामानिमित्त रात्रपाळीसाठी ये-जा करणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे ही कुत्री धावतात. प्रसंगी चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे हे कामगार आपली वाहने जोरात पळवण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अनेक लहान-मोठे अपघात झाले आहेत. यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"शहरात मोकाट श्वानांनी उच्छाद मांडला असून महापालिकेने यांना वेळीच बंदिस्त करणे गरजेचे आहे, भटक्या श्वानांनी चावा घेतल्यामुळे रेबीजसारख्या आजारांची लागण होऊ शकते. अनेक वेळा ते अंगावर येत असल्यामुळे लहान बालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर एखादा मोठा अपघात होऊन एखाद्या नागरिकाला प्राणास मुकावे लागले तर याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असेल."
- मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते
घरांच्या बाहेर लाल पाण्याच्या बाटल्या
पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक घराच्या बाहेर बाटलीमध्ये कुंकवाचे लाल पाणी एकत्र करून त्या बाटल्या तारेने बांधलेल्या दिसून येतात. अशा लाल पाण्याच्या प्रभावामुळे कुत्रे फिरकत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पण याला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नाही. कुत्र्यांपासून आपला जीव वाचवण्यासाठी परिसरातील बहुतांश घरांच्या बाहेर अशा लाल रंगाच्या पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या दिसून येत आहेत.
"अनेकदा मोकाट श्वानांच्या कळपामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी भीती वाटते. एकटे जाणारे विद्यार्थी बघून श्वान त्यांच्यावर धावून जातात. यामुळे मुले घाबरली आहेत. यामुळे अनेक वेळा ती शाळेत जाण्यास नकार देतात."
- अश्विनी अदोने, नागरिक
निर्बीजीकरणावर लाखोंचा खर्च
महापालिकेच्या वतीने वर्षानुवर्षे पशुवैद्यकीय विभागामार्फत निविदा काढून मोकाट श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यात येते. या कामाचा स्वतंत्र ठेकेदार नियुक्त केला जातो. या कामासाठी लाखो रुपये खर्च करून श्वानांची संख्या नियंत्रणात येत नाही. मात्र, त्यांची संख्या नियंत्रणात येण्याऐवजी ती वाढताना दिसत आहे. मागील काळात श्वानांची बोगस संख्या दाखवून खोटी बिले काढल्याचा आरोप ठेकेदार कंपनीवर झाला आहे. शहरातील भटक्या श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
"भटक्या श्वानांमुळे नेहमीच दुचाकीवरून जात असताना त्यांचा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी अनेक श्वान मागे लागतात. त्यामुळे दुचाकीवरून पडून अपघात होण्याची दाट शक्यता असते."
- सिद्धनाथ ठोकळे, नागरिक
भटक्या श्वानांसाठी महापालिका काय करते?
-दीड वर्षात आठ हजार श्वानांवर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया
-श्वान पकडण्यासाठी ठेकेदार नेमण्यासाठी टेंडर नाही
-पीपल फॉर ॲनिमल संस्थेचे काम बंद केले
-सध्या महापालिका स्वतः उपचार करते
-सरासरी २० जखमी श्वानांवर उपचार
-पकडण्यासाठी चार डॉग व्हॅन आहेत
-उपचारांसाठी एक ॲम्बुलन्स आहे
-मानधनावरील पाच डॉक्टर काम पाहात आहेत
-दिवसाला १८ श्वानांवर शस्त्रक्रिया
- श्वान पकडण्यासाठी आहेत १३२ पिंजरे