पिंपरी-चिंचवड : महिला पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेची सुरक्षित प्रसूती

प्रसव वेदना सुरू असलेल्या महिलेने चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला वाहतूक पोलिसांना मदत मागितली. डॉक्टर, रुग्णवाहिका येईपर्यंत हाती वेळ नसल्याने महिला पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेला सुरक्षित ठिकाणी नेत तिची प्रसूती केली.

Pimpri Chinchwad Police

पिंपरी-चिंचवड : महिला पोलिसांच्या तत्परतेमुळे महिलेची सुरक्षित प्रसूती

प्रसव वेदना सुरू असलेल्या महिलेने चौकात वाहतूक नियंत्रण करणाऱ्या महिला वाहतूक पोलिसांना मदत मागितली. डॉक्टर, रुग्णवाहिका येईपर्यंत हाती वेळ नसल्याने महिला पोलिसांनी तत्परता दाखवत महिलेला सुरक्षित ठिकाणी नेत तिची प्रसूती केली. ही कौतुकास्पद कामगिरी हिंजवडी वाहतूक विभागातील महिला पोलीस हवालदार नीलम विजय चव्हाण आणि महिला पोलीस शिपाई रेश्मा नजीर शेख यांनी केली. याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

याबाबत माहिती अशी की, महिला पोलीस अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख या हिंजवडी वाहतूक विभागात नेमणुकीस आहेत. शनिवारी (दि. १) दुपारी त्या वाकड नाका येथे कर्तव्यावर हजर होत्या. दुपारी चार वाजताच्या सुमारास राजश्री माधव वाघमारे (वय २५) प्रसूतीसाठी औंध हॉस्पिटल येथे जात होत्या. हिंजवडी वाहतूक विभागाच्या कार्यालयाजवळ आल्यानंतर राजश्री यांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांना प्रसव वेदना सुरू झाल्या. 

भर रस्त्यावर त्रास सुरू झाल्याने त्यांनी चौकात वाहतूक नियमन करत असलेल्या नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांना मदतीसाठी बोलावले. चव्हाण आणि शेख यांनी महिलेकडे धाव घेतली आणि रुग्णवाहिकेला पाचारण केले. रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यासाठी काही वेळ लागणार होता. राजश्री यांचा त्रास वाढत होता. त्यामुळे चव्हाण आणि शेख यांनी राजश्री यांना वाहतूक विभागाच्या बाहेरील बाजूस रोडच्या कडेला असलेल्या खोलीमध्ये आडोशाला नेले. 

दरम्यान, रुग्णवाहिका आणि डॉक्टर येण्यापूर्वीच राजश्री यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. डॉक्टर आल्यानंतर त्यांनी बाळाची व राजश्री यांची तपासणी केली. त्यानंतर दोघांनाही पुढील उपचारासाठी औंध हॉस्पिटल येथे नेण्यात आले. 

नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांनी प्रसंगावधान राखत महिलेला मदत केली. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख यांचा सत्कार करत शाबासकी दिली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest