रेल्वे मार्गावरील पिंपरी, चिंचवड स्टेशनचे कालबाह्य उड्डाणपूल पाडण्यासाठी रेल्वेकडून महापालिकेला पत्र
पिंपरी गावाला जोडणारा इंदिरा गांधी उड्डाण पूल आणि चिंचवड स्टेशन या रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल हे कालबाह्य झाले आहेत. महापालिकेने या दोन्ही उड्डाणपुलांची तात्पुरती दुरुस्तीदेखील केली होती. तरीही हे दोन्ही उड्डाणपूल धोकादायक बनले असून त्या पुलांचे आयुष्य संपले आहे. गंभीर अपघात होण्याची वाट बघण्यापूर्वी हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्यात यावे, अशी मागणी जागरूक पिंपरी-चिंचवडवासियांकडून करण्यात येत आहे.
हे दोन्ही उड्डाण पूल तत्काळ पाडण्यात यावे, जेणेकरून भविष्यातील अपघात टाळण्यात येईल, असे पत्र रेल्वे विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला देण्यात आले आहे. रेल्वे विभागाने पाठवलेल्या पत्रावर महापालिका आता कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागून आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरीगाव, मार्केट येथील इंदिरा गांधी उड्डाण पूल खूप जीर्ण झाला आहे. तसेच, चिंचवड स्टेशन येथील पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि चिंचवड गावाला जोडणारा उड्डाणपूलदेखील कालबाह्य झाला आहे. हे दोन्ही उड्डाणपूल पाडण्यात यावे, यासाठी नागरिकांकडून अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. रेल्वे मार्गावरील दोन्ही उड्डाणपूल तत्काळ पाडण्यात यावे, याकरिता रेल्वे विभागाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र देऊन पाठपुरावा सुरू आहे. परंतु, हे उड्डाणपूल पाडल्यास पिंपरी आणि चिंचवड गावाकडे जाणारी वाहतूक कोणत्या मार्गाने सोडायची, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे.
पुणे-मुंबई जुना महामार्ग आणि पिंपरी गावास जोडणारा पुणे-लोणावळा लोहमार्गावरील पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पूल हा शहरातील सर्वांत पहिला पूल आहे. ‘‘या उड्डाणपुलाचे आयुष्य संपले आहे. सगळे बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल वाहतुकीस बंद करा. पूल पाडून टाका,’’ असे पत्र रेल्वे विभागाने महापालिकेस तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात पाठविले होते. शहरातील दोन भागांना जोडणारा हा महत्त्वाचा पुल असल्याने महापालिकेने पुलाचे स्ट्रॅक्चरल ऑडिट केले. त्यानंतर त्यांचे मजबुतीकरण करण्यात आले. हे काम सुमारे दोन ते तीन वर्षे सुरू होते. त्यावर उड्डाणपूल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला. त्यानंतर पिंपरीच्या उड्डाणपुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे.
शहरातील चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाणपुलाच्या बांधकामास ४७ वर्षे झाली आहेत. हेही बांधकाम धोकादायक झाले असून, तो पूल पाडा, असे पत्र रेल्वेने महापालिकेस नुकतेच पाठविले आहे. या पुलाशेजारी महापालिकेने सुमारे १५ वर्षांपूर्वी समांतर पूल बांधला आहे. जुना पूल तोडावा लागणार असल्याने येथील वाहतूक समस्या अधिक गंभीर होणार आहे. हे दोन्ही पूल महापालिका पाडून नव्याने पूल कसे तयार करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दोन्ही उड्डाणपूल पाडल्यास वाहतूक कोंडी होणार
पिंपरीगाव आणि चिंचवडगाव या दोन्ही उपनगराला जोडणाऱ्या रेल्वे मार्गावरील उड्डाण पूल हे धोकादायक बनले आहेत. यातील पिंपरीच्या इंदिरा गांधी उड्डाणपुलावर कोट्यवधी रुपये खर्च करून देखभाल दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे हा पूल आणखी पाच वर्ष सुरू राहिल्यास काहीच अडचण राहणार नाही. चिंचवड स्टेशन येथील उड्डाण पूलदेखील कालबाह्य झालेला आहे. या पुलावर अवजड वाहतूक बंद केलेली आहे. त्यामुळे दोन्ही पुलांसाठी पर्यायी व्यवस्था उभी करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता पिंपरीत डेअरी फार्म येथील पुलाचे युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, चिंचवड स्टेशन येथून अद्याप कोणतीही पर्यायी यंत्रणा नाही. त्यामुळे दोन्ही उड्डाण पूल लगेच पाडल्यास प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांना वळसा घालून पिंपरी, चिंचवडला जावे लागणार आहे.
चिंचवड स्टेशन येथील लोहमार्गावरील उड्डाण पुलास ४७ वर्षे झाली आहेत. त्यामुळे पुलाचे बांधकाम धोकादायक झाले आहे. तो पूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र महापालिकेस प्राप्त झाले आहे. यापूर्वीच पिंपरी येथील इंदिरा गांधी उड्डाण पूल पाडावा, असे रेल्वेचे पत्र आले आहे. त्या पुलाचे मजबुतीकरण करण्यात आले आहे. या दोन्ही पुलांचे काय करायचे, या संदर्भात आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.