संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयात रुग्णांना सोनोग्राफी मशिनवर तपासणीसाठी रुग्णांना पंधरा ते एक महिना प्रतीक्षा करावी लागत आहे. रुग्णालयात सोनोग्राफी मशिनची कमतरता असून रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे सोनोग्राफी मशिनवर तपासणी करण्यासाठी रुग्णांना बरीच प्रतीक्षा करावी लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगांव रुग्णालयात सध्या २ सोनोग्राफी मशिन उपलब्ध आहेत. त्यापैकी एक मशिन काही तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद होती. दररोज बाह्य रुग्ण विभागात रुग्णाची संख्या वाढत आहे. एका सोनोग्राफी मशिनवर रुग्णांना तपासणीला २ महिने वेटिंग करावी लागत होती. दरम्यान, आता दुसरी मशिनदेखील गेल्या ४ ते ५ दिवसांपूर्वी सुरू झाली. त्यामुळे रुग्णांना सोनोग्राफीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा कमी झाली आहे.
सध्या रुग्णालयामध्ये दररोज ५० ते ७० इतक्या सोनोग्राफी केल्या जात आहेत. तातडीची सोनोग्राफी करण्याची गरज असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी पहिले प्राधान्य दिले जात आहे. त्यानंतर थेरगाव रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे. बाहेरील रुग्णालयांमधून सोनोग्राफीसाठी येणाऱ्या रुग्णांचा त्यानंतर नंबर दिला जात आहे. त्यामुळे सोनोग्राफी मशिन तत्काळ वाढवून रुग्णाना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
नवीन थेरगाव रुग्णालयातील एक सोनोग्राफी मशिन तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद होती. गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी ही मशिन सुरू झाली आहे. मात्र, सोनोग्राफीसाठी येणारी रुग्णसंख्या जास्त असल्याने रुग्णांना सोनोग्राफीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तथापि, तातडीने सोनोग्राफी करणे गरजेचे असलेल्या रुग्णांची सोनोग्राफी प्राधान्याने केली जात आहे.
– डॉ. राजेंद्र फिरके, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, नवीन थेरगाव रुग्णालय
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.