संग्रहित छायाचित्र
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिकेच्या प्रवेशद्वारावर हेल्मेट सक्ती लागू केली आहे. त्यामुळे आता महापालिकेतील कर्मचारी किंवा कामानिमित्त आलेले नागरिक यांना हेल्मेट परिधान करूनच महापालिकेच्या प्रवेशद्वार अथवा आवारात प्रवेश करावा लागेल. तशा सूचना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी सुरक्षा विभागाला दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच्या काळात जिल्हा प्रशासनाकडून हेल्मेट सक्तीचा आदेश काढण्यात आला होता. तसा आदेश पिंपरी चिंचवड महापालिकेला पाठवला होता. त्या आदेशात महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्तीबाबत आदेशित करण्यात आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या कालावधीमध्येच महापालिकेतील कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती लागू झाली होती. परंतु महापालिका आयुक्तांनी महापालिकेच्या आवारात येणाऱ्या सर्वच कर्मचारी, अधिकारी, नागरिकांना हेल्मेट सक्ती लागू केली आहे.
महापालिकेत विविध कामानिमित्त शुक्रवारी येणा-या नागरिकांना विना हेल्मेट आलेल्यांना प्रवेशद्वार अडविण्यात आले. हेल्मेट नसलेल्या नागरिकांना आयुक्तांनी अचानक काढलेल्या आदेशाने मनस्ताप सहन करावा लागला. अनेकांना प्रवेशद्वाराच्या बाहेरच सुरक्षारक्षकांनी अडवले. त्यामुळे नागरिकांना काम न करताच माघारी फिरावे लागले.
याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुरक्षा विभागाचे मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हेल्मेट सक्तीबाबत सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आयुक्तांनीसुद्धा तशा सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
हेल्मेट सक्तीबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून आलेल्या सूचनांमुळे आता नागरिकदेखील हेल्मेट सक्तीच्या फेऱ्यामध्ये अडकले आहेत. त्यांनादेखील हेल्मेट परिधान करून महापालिकेत प्रवेश करावा लागेल. नियमांना बगल दिल्यास पालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.