पिंपरी-चिंचवड : रस्त्यांच्या खोदकामाने पडली शहरातील वाहतूक कोंडीत भर
महापालिकेच्या 'फ' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत स्पाईन रोड ते यमुनानगर परिसरात रस्ते खोदकामाला परवानगी दिली असताना संबंधित ठेकेदाराने तळवडे, रुपीनगर परिसरातील सगळ्याच रस्त्यांवर खोदकाम सुरू केले आहे. महापालिका फ क्षेत्रीय स्थापत्य विभागाकडून स्पाईन रोड ते यमुनानगर या रस्त्यावर ओ.एफ.सी. केबल दुरुस्तीसाठी मे. जिओ डिजिटल फायबर प्रा. लि. यांना रस्ते खोदकामाला परवानगी दिली आहे.
रुपीनगर, तळवडे भागातदेखील संबंधित ठेकेदार कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. मात्र ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवत या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या नाहीत. तसेच चालू असलेल्या कामाचा फलक नियमानुसार लावलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी व अपघात होत आहेत. जिथे-जिथे रस्ते खोदण्यात आले आहेत, तिथे तत्काळ डांबरी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. तळवडे, रुपीनगर परिसरातील विविध रस्त्यांलगत अनेक सोसायट्या व व्यावसायिक दुकाने आहेत. त्यामुळे केबल टाकण्यासाठी रस्त्यांचे खोदकाम केले जात आहे. या कामाचा वेग अत्यंत संथ आहे. धिम्या गतीने होणाऱ्या कामाचा त्रास येथील रहिवासी व ग्राहकांना होत आहे. जागोजागी रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यामुळे संपूर्ण वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. रात्रीच्या वेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना न केल्याने अपघात होत आहेत. तसेच रस्ता खोदल्याने तो अरुंद झाला आहे. तसेच रस्त्याच्या कडेला वाहनेदेखील लावलेली असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना मुख्य रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे.
आधीच रस्ता लहान, त्यात अनधिकृत पार्किंग
'फ' क्षेत्रीय स्थापत्य विभागाकडून विविध कामांसाठी रस्त्यांवर खोदकाम केले जाते. या खोदकामामुळे तळवडे, रुपीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अरुंद रस्त्यावरील खोदकामामुळे रस्त्यांवरून चालणे कठीण झाले आहे. अनेक वाहने रस्त्यावरच आडवी-तिडवी लावली जात आहेत. रस्ता लहान असल्याने लगेच रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. याचा त्रास रहिवाशांना होत आहे. त्यामुळे ही कामे गतीने करण्याची मागणी केली जात आहे.
तळवडे, रुपीनगर भागात रस्ते खोदकामाने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात दिवसभर शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. परिणामी वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वाहतूक कोंडी प्रचंड होऊन रस्त्याची देखील बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसभर रस्त्यांचे खोदकाम होत असल्याने नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.
- श्रीनिवास बिरादार, सामाजिक कार्यकर्ता
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.