संग्रहित छायाचित्र
वाहतूक नियमांचे उल्लंघन, सिग्नल न पाळणे त्याचप्रमाणे प्रवाशांच्या देखील वेगवेगळ्या तक्रारी पीएमपीएमएलकडे प्राप्त होतात. याबाबत आता प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, पुणे शहरातील दोन चालकांवर कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरात देखील अशा प्रकारची कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. अलीकडे बसचालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याचे प्रकर्षाने स्पष्ट झाले आहे.
पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी- चिंचवड भागात पीएमआरडीए कार्यक्षेत्रापर्यंत बससेवा पुरवली जात आहे. त्यामध्ये पीएमपी आणि ठेकेदारांच्या बसवरील चालक वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत नसल्याबाबत प्रशासनाला वारंवार तक्रारी व सूचना प्राप्त होत आहेत. या तक्रारीमध्ये प्रामुख्याने बस चालवताना मोबाईलवर बोलणे, झेब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, धूम्रपान करणे, मार्ग बोर्ड न बदलणे, लेनच्या शिस्तीचे पालन न करणे, सिग्नल तोडणे या तक्रारींचा समावेश आहे. बस चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, धूम्रपान करू नये, बसेस रस्त्यात उभ्या न करता बस स्टॉपवर उभ्या कराव्यात, लेनच्या शिस्तीचे पालन करावे, भरधाव वेगाने बसेस चालवू नये, अशा विविध प्रकारच्या सूचना दिल्या असून त्याचे चालक आणि वाहक किती पालन करतात ते पाहावे लागेल. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये तीन बस आगार आहेत. या ठिकाणी साडेपाचशे बस आहेत. शहरामध्ये धावताना चालकांकडून अनेक चुका होतात. त्याबाबत त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन चालकांवर नुकतीच कारवाई करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरात देखील अशा प्रकारची कारवाई करण्याबाबत सूचना केल्या आहेत. नियमांचे पालन न केल्यास संबंधित चालक-वाहकांवर दंड आणि निलंबनाची कारवाई देखील होते.
- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल
वेगावर हवे नियंत्रण
पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवडगाव, पिंपरी, काळेवाडी, भोसरी, ताथवडे यासारख्या दाट लोकवस्तीमध्ये बसचालकांकडून नियम पाळले जात नाहीत. त्याचप्रमाणे वळण घेत असताना वेगावर नियंत्रण राखले जात नाही. परिणामी, छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. यावर देखील कारवाई करण्याची अपेक्षा प्रवासी वर्गाने व्यक्त केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.