संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीलगत मेट्रोचे चार पार्किंग प्रस्तावित आहेत. जागा ताब्यात घेऊन त्याबाबत कार्यवाही सुरू झाली नव्हती. आता हे काम अंतिम टप्प्यात असताना आता महामेट्रोकडून संबंधित पार्किंगचा ठेका काढून घेण्यात आला आहे. कामाची गती समाधानकारक नसल्याने, त्याचप्रमाणे नियोजित वेळेत काम न केल्याने संबंधित ठेकेदाराला यापूर्वीही नोटीस बजावली होती. त्यानंतरही सुधारणा न झाल्याने अखेर ठेका काढून घेण्यात आला. आचारसंहितेनंतर त्याबाबतची पुढील कार्यवाही सुरू होणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो पार्किंग प्रस्तावित आहेत. मात्र, ते कार्यान्वित न झाल्याने प्रवाशांना रस्त्यावर येण्याची वेळ येत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये पार्किंगबाबत महा मेट्रोकडून घोषणा करण्यात आली होती. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात अद्याप एकही पार्किंग सुरू झाले नाही. परिणामी ही योजना कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीसीटीव्ही आणि इतर कामे सुरू असून, पार्किंग सुरू होईल, असे मेट्रोकडून सांगण्यात येते होते. मात्र प्रत्यक्षात पार्किंग सुरू झाले नाही. त्यानंतर आता संबंधित ठेकेदाराकडून पार्किंगचे काम काढून घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत ही पार्किंग मोफत ठेवण्यात आली असून काही काळानंतर त्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे.
पीसीएमसी स्थानक ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉलपर्यंत विस्तारित मेट्रो सेवा सुरू झाली आहे. तर, दुसरा टप्प्यानंतर आता स्वारगेटपर्यंत मेट्रो होऊ लागली आहे. तर, त्यानंतर आता पिंपरीतील मेट्रो निगडीपर्यंत विस्तारणार आहे. पिंपरी आणि पुणे ही दोन शहरे मेट्रो मार्गाने जोडल्यामुळे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढली आहे. घर ते मेट्रो स्टेशनपर्यंत येण्यासाठी नागरिक स्वतःची वाहने वापरतात. मात्र मेट्रो स्थानकांवर वाहनांची पार्किंग नसल्याने शेजारील पदपथावर अथवा मेट्रोच्या खालील बाजूने वाहने उभी करत आहेत. रस्त्यावर वाहन पार्किंग केल्यावर वाहतूक पोलिसांकडून दंड आकारण्यात येतो. दुसरीकडे, पार्किंग नसल्याने संपूर्ण मोरवाडी चौक (पीसीएमसी स्थानक) पूर्णपणे बकाल बनला आहे. याबाबत महापालिका आणि वाहतूक पोलीस देखील सक्षम कारवाई करत नसल्याने ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे
पिंपरी-चिंचवडमध्ये तीन पार्किंगचा समावेश आहे, तर बोपोडी या ठिकाणीदेखील एक पार्किंग आहे. पिंपरी-चिंचवड स्थानक या ठिकाणी दीड हजार चौरस मीटर, वल्लभनगर स्थानक या ठिकाणी चार हजार चौरस मीटर, फुगेवाडी या ठिकाणी ५३० चौरस मीटर आणि बोपोडी या ठिकाणी २०० चौरस मीटर जागेवर पार्किंग व्यवस्था उभारण्यात येणार आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराकडून याबाबत वेळेत कार्यवाही न झाल्याने पुढील ठेका रद्द करण्यात आलेला आहे. परिणामी, नियोजित पार्किंग व्यवसायासाठी पुन्हा वाहनचालकांना वाट पाहावी लागणार आहे.
जागा ताब्यात, कार्यवाही शून्य
मेट्रो स्थानकांवरील वाहनतळ सायकली, दुचाकी, चारचाकीसह व्यावसायिक वाहनांसाठी उपलब्ध आहे. या वाहनतळांमध्ये बूम बॅरिअर, वीज आणि सीसीटीव्ही कॅमेरा आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त ॲपद्वारे बुकिंग, डिजिटल पेमेंट, पार्किंग क्षमता दर्शवणारे डिजिटल बोर्ड याही सुविधा असणार आहेत. मात्र यापैकी संबंधित ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने त्याबाबतचा ठेका काढून घेण्यात आला आहे.
फिडर सेवा वाढवण्याबाबत भर
महा मेट्रोकडून पार्किंग व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी पीएमपी प्रशासनाकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अधिकाधिक फिडर सेवा देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत्या काळात फिडरसेवा वाढवण्याबाबत भर देण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यामध्ये नव्याने काही बस दाखल होणार आहेत. त्या अनुषंगाने फिडर सेवेला त्या नवीन बस जोडण्यात येतील.