संग्रहित छायाचित्र
अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीवर (टॉवर लाईनवर) इंटरनेट केबलचा तुकडा पडल्याने शार्टसर्किट होऊन वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, दीड ते दोन तास वीज विस्कळीत झाल्याने नागरिकांनी तक्रार केल्यानंतर तो सुरळीत झाला. पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी, काळेवाडी या परिसरात ऐन दिवाळीच्या काळात नागरिकांना मंगळवारी विजेची समस्या भेडसावली.
रहाटणी येथील महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्राला अतिउच्चदाब १३२ केव्ही चिंचवड-रहाटणी वीजवाहिनीद्वारे वीजपुरवठा होतो. रहाटणी उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार प्राप्त झाली. वाकड येथील वूड्स सोसायटीजवळ या वीजवाहिनीच्या तीनपैकी दोन वीजवाहिन्या शॉर्टसर्किटने क्षतिग्रस्त झाल्याचे दिसून आले. त्याचखाली जमिनीवर इंटरनेटच्या केबलचे काही तुकडे जळालेल्या अवस्थेत आढळून आले. पाहणी केल्यानंतर प्रथमदर्शनी असे दिसून आले की, पक्ष्याने इंटरनेटच्या केबलचा तुकडा घेऊन या वीजवाहिनीवर बसण्याचा प्रयत्न केला. यात इंटरनेट केबलच्या तुकड्याचा एकाचवेळी दोन वीजवाहिन्यांना स्पर्श झाल्याने शॉर्टसर्किट झाले व वीजपुरवठा खंडित झाल्याची शक्यता आहे.
दरम्यान, रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्राला महापारेषणकडून गणेशखिंड २२० केव्ही उपकेंद्रातून चिंचवड-गणेशखिंड अतिउच्चदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र विजेची मागणी वाढली असल्याने या वीजवाहिनीवर भारव्यवस्थापन शक्य झाले नाही. परिणामी इतर पाच वीजवाहिन्यांवर नाईलाजाने भारनियमन करावे लागले. यामुळे सकाळच्या सुमारास पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, रहाटणी व काळेवाडी परिसरात २० मिनिट ते १.३० तासापर्यंत वीजपुरवठा खंडित होता. त्यानंतर भारव्यवस्थापनासाठी तांत्रिक उपाययोजना करून रहाटणी १३२ केव्ही उपकेंद्रातील वीजवाहिन्यांना महापारेषणच्या चिंचवड व हिंजवडी अतिउच्चदाब उपकेंद्रातून पर्यायी स्वरूपात वीजपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सर्वच परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला.