संग्रहित छायाचित्र
मोशीकरांना (Moshi) सध्या तिहेरी प्रदूषणाला तोंड द्यावे लागत आहे. कचऱ्याची (Garbage) दुर्गंधी, इंद्रायणी नदीपात्रातील दूषित पाणी तर तिसरीकडून वाहतूक कोंडीचा धूर यामुळे मोशीतील नागरिकांचे आयुष्य धोक्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहरातील मोशी हे गाव मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. विविध सोयी-सुविधा आणि प्रकल्पामुळे येथे हजारो नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे मोशीची ओळख पिंपरी-चिंचवडचे उपनगर अशी निर्माण झाली आहे.
मात्र सद्यस्थितीत येथील स्थानिकांसह अनेक नागरिक विविध प्रकारच्या प्रदूषणाने (Pollution) त्रस्त झाले आहेत. शहराचे प्रवेशद्वार असलेले मोशी उपनगर हे इंद्रायणी नदीच्या दूषित पाण्याच्या दुर्गंधीने त्रस्त आहे. नदीच्या किनाऱ्यालगत उभे राहणेदेखील शक्य होत नाही. अशा परिस्थितीत येथील उंच इमारतीत अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेल्या इंद्रायणी नदीतून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.
एका बाजूला नदीचे प्रदूषित पाणी तर दुसऱ्या बाजूला मोशीचा कचरा डेपोची दुर्गंधी, अशा कात्रीत मोशीकर सापडले आहेत. ऑक्टोबरनंतर पूर्वेकडून वारे वाहण्यास सुरुवात झाली की, या कचरा डेपोच्या दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढतो. गेल्या अनेक वर्षांपासून या दुर्गंधीयुक्त वातावरणात वाघजाई पार्क, आदर्शनगर, गंधर्वनगरी, मोशी प्राधिकरण येथील नागरिक आपले जीवन जगत आहेत. अनेक वर्षांपासून मोशीमधून कचरा डेपो हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. , नागरिकांच्या या मागणीला यश मात्र अद्यापपर्यंत आलेले नाही आणि भविष्यात याची शाश्वती वाटत नाही. कारण या समस्येकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नाही.
हिवाळ्यात जसे सर्वत्र धुके पडते तसे मोशीतील या भागात कायमच धुरकट वातावरण पाहायला मिळते. मोशीतील कचरा डेपोच्या समोरील बाजूस आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र विकसित होत आहे. शासनाचे काही मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, तर काही प्रकल्प भविष्यात येथे येणार आहेत. मात्र, असे असताना कचरा डेपोचा प्रश्नदेखील कायम राहणार का, हा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात कायम आहे.
लालफितीत अडकलेल्या महामार्गाचाही त्रास
जलप्रदूषण, कचरा डेपोची दुर्गंधी यात भर म्हणून पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी हादेखील येथील ग्रामस्थांना सतावणारा मोठा प्रश्न आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ या वेळेत या महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. दररोज तीन-चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. या वाहनांतून मोठ्या प्रमाणात धूर निघून तो या परिसरातील हवेत पसरला जातो. यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. अनेक प्रकारच्या श्वसनाच्या विकारांनी लहानपणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ग्रासले आहे. दोन वर्षांपूर्वी महामार्ग रुंदीकरण करण्यासाठी येथील अतिक्रमणे महापालिकेकडून हटविण्यात आली. मात्र, अद्याप रुंदीकरणाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. लालफितीत अडकलेला महामार्ग मात्र मोशीकरांना दररोज मोठ्या प्रमाणात प्रदूषण देऊन जात आहे.
श्वसनाचे आजार वाढले
कचरा डेपोतून निघणारा धूर, विषारी वायू, धूलिकण यामुळे या भागातील नागरिक, वयोवृद्ध, लहान मुले यांच्या श्वसनाच्या विकारांचे प्रमाण वाढू लागले आहे. यापासून स्वत:ला आणि कुटुंबीयांना दूर ठेवण्यासाठी कचरा डेपोच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना काय करावे आणि काही नाही, असे प्रश्न पडत आहेत. धुरामुळे दम्याचा आजार असणाऱ्या वयोवृद्धांना श्वास घेताना त्रास होत आहे. त्याचबरोबर लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आणूनदेखील कचऱ्याचे डोंगर हटविले गेले नाहीत.
आमदारांच्या निष्क्रियतेमुळे समस्या जैसे थे
मोशी कचरा डेपोत कच-याचे डोंगर तयार झाले आहेत. या कचऱ्याच्या डोंगरामुळे मोशी गावच नव्हे तर च-होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, डुडुळगाव यासह अनेक भागात कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक बेजार झाले आहेत. नागरिकांना आयुष्यभराचे आजार जडले आहेत. कचऱ्याच्या डोंगराचा प्रश्न आमदार महेश लांडगे यांच्या निष्क्रियतेमुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे कचरा डेपो परिसरात राहणाऱ्या नागरिकांमध्ये आमदारांच्या निष्क्रीय कारभाराबाबत प्रचंड नाराजी पसरली आहे. महापालिका हद्दीतील कचरा मोशी येथील डेपोमध्ये आणून टाकला जातो. त्यामुळे मोशीतील माळरानावर डोंगरासारखे कचऱ्याचे ढीग लागले आहेत. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कचरा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत.
शहरातून दररोज सुमारे बाराशे टन कचरा गोळा होत आहे. कित्येक वर्षांपासून हा प्रश्न आमदार लांडगे यांना सोडवता आला नाही. केवळ कचऱ्याच्या डोंगरावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून औषध फवारणी केली जाते. तरीही कचऱ्याची दुर्गंधी हटण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे मोशी, च-होली, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी यासह तापकीरनगर, खानदेशनगर, आदर्शनगर, गंधर्वनगरी, वाघजाई पार्क, बोराटे वस्ती, मोशी प्राधिकरणातील नागरिकांचे जगणे अवघड झाले आहे.