संग्रहित छायाचित्र
दिवाळीत जसे प्रत्येक घरात दीपप्रज्वलन केले जाते, तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या मताचा दीप लोकशाहीच्या निवडणूकरुपी उत्सवात लावावा. त्यातून देशाचे भवितव्य अधिक उज्ज्वल, पारदर्शक आणि न्याय्य होईल, असा संदेश देत महापालिकेच्या वतीने दिवाळी पहाट कार्यक्रमात सुमारे ७०० मतदारांनी मतदान करण्याचा संकल्प केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वतीने निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आला. यावेळी साहाय्यक आयुक्त पंकज पाटील, गायक पं. अजितकुमार कडकडे, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कलाकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भोसरी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी घेतली मतदान करण्याची शपथ
भोसरी औद्योगिक वसाहतीतील कामगारांनी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याबाबत शपथ घेतली. कामगारांच्या भवितव्यासाठी आवर्जून मतदान करणार असल्याची भावना कामगारांनी यावेळी व्यक्त केली. तसेच टॅकलक्राफ्ट कंपनीचे संचालक नीलेश मोहिते यांनी कामगारांना मतदान करण्यासाठी पगारी सुट्टी देणार असल्याचे सांगितले.
डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांचा मतदान करण्याचा निर्धार
भोसरी येथील महापालिकेच्या नवीन भोसरी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, कर्मचारी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचा निर्धार केला असून महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार जनजागृती मोहिमेची माहिती परिसरातील लोकांना देऊन नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणार असल्याचे मत रुग्णालयातील परिचारिकांनी व्यक्त केले. यावेळी ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा लोखंडे यांच्यासह डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.
मजुरांनी घेतली मतदानाची शपथ
कुदळवाडी आणि भोसरी येथील मजूर अड्ड्यावर मजुरांनी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये मतदान करण्याचा संकल्प केला. यावेळी महापालिकेचे कर्मचारी यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांच्या मताचे महत्त्व कामगारांना पटवून देण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाट्याच्या माध्यमातून मतदारांचे प्रबोधन तसेच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत माहिती देण्यात येत आहे.