निगडी, आकुर्डीतील मेट्रो स्‍टेशन कामाला गती

पिंपरी ते निगडी या प्रस्तावित मेट्रोच्‍या कामाला गती वाढली आहे. येत्या अडीच वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचा मानस महा मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या निगडी आणि आकुर्डी येथील मेट्रो स्‍थानकांच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुढच्‍या टप्‍प्‍यात चिंचवड येथील स्‍थानकाच्‍या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 30 Oct 2024
  • 11:40 am
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी नेमले खासगी वॉर्डन, अडीच वर्षांत काम पूर्ण होणार?

पिंपरी ते निगडी या प्रस्तावित मेट्रोच्‍या कामाला गती वाढली आहे. येत्या अडीच वर्षांमध्ये हे काम पूर्ण करण्याचा मानस महा मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या निगडी आणि आकुर्डी येथील मेट्रो स्‍थानकांच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुढच्‍या टप्‍प्‍यात चिंचवड येथील स्‍थानकाच्‍या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, कामामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी समस्या निर्माण होत आहे. त्यासाठी ४० खासगी वॉर्डन नेमण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक वाहतूक पोलिसांची देखील समन्वय साधून काम सुरू आहे.

स्वारगेट ते पिंपरी- चिंचवड महापालिका हा मार्ग पुढे निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत वाढवावा, अशी  नागरिकांकडून सातत्याने मागणी केली जात होती. या विस्तारित मार्गाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने २३ ऑक्टोबर २०२३ रोजी मान्यता दिली होती. त्यानंतर पुणे मेट्रो प्रशासनाने १६ डिसेंबर रोजी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार या कामाला आता सुरुवात झाली होती. भक्ती-शक्ती चौक आणि पवळे ब्रीज येथे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे.

सुरुवातीला माती परीक्षणाचे कामकाज सुरू करण्यात आले. या मार्गावर चिंचवड, आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि भक्ती-शक्ती चौक या स्थानकांचा समावेश असणार आहे. या कामांना गती मिळाली आहे. निगडी येथील भक्‍ती-शक्‍ती चौक आणि आकुर्डी येथील मेट्रो स्‍थानकाचे काम झाले आहे. या दोन्‍ही ठिकाणचे फाऊंडेशनचे कामकाज पूर्ण करण्यात आले आहे. आता चिंचवड येथील स्‍थानकाच्‍या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासह सध्या निगडीपर्यंत पिलर उभारण्याच्‍या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. या कामांसाठी दोन्‍ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. वाहतुकीला अडथळे येऊ नयेत, यासाठी वाहतूक शाखेला नियोजन करण्याबाबत कळवण्यात आले असल्‍याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले. अडीच वर्षांत हे काम पूर्ण करण्याचे उद्देश असल्‍याचे मेट्रो प्रशासनाच्‍या वतीने सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे खडकी हे स्थानक येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण होऊन कार्यान्वित होईल, अशी माहिती देखील मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिली. नोव्हेंबर अखेरपर्यंत हे स्थानक सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यानंतर खडकी परिसरातील नागरिकांना देखील मेट्रोचा वापर करता येणार आहे. फुगेवाडी आणि कासारवाडी या दोन ठिकाणी प्रवासी संख्या तुलनेने कमी आहे. ती वाढवण्याबाबत मेट्रोकडून नियोजन देखील आखण्यात आले आहे.

निगडी आणि आकुर्डी येथील मेट्रो स्‍थानकाची फाऊंडेशनपर्यंतची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अडीच वर्षात काम पूर्ण करण्याचा मेट्रो प्रशासनाचा उद्देश आहे. पिलरचे देखील काम सुरू आहे. कामाला गती आहे.

- हेमंत सोनवणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest