पिंपरी-चिंचवड: घातक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची?

शहरातील एमआयडीसी आणि चिखली, कुदळवाडी, तळवडे या परिसरात सध्या कंपन्यांतील घातक कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या परिसरातील चार ते साडेचार हजार छोट्या-मोठ्या उद्योगांना ही समस्या जाणवत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 30 Oct 2024
  • 12:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

एमआयडीसी परिसरात काचा, केमिकल्स अन् बॅटऱ्यांच्या कचरा

शहरातील एमआयडीसी आणि चिखली, कुदळवाडी, तळवडे या परिसरात सध्या कंपन्यांतील घातक कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या परिसरातील चार ते साडेचार हजार छोट्या-मोठ्या उद्योगांना ही समस्या जाणवत आहे. उद्योगांतील घातक कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही यंत्रणा महापालिकेकडे नाही. रांजणगाव येथील खासगी कंपनीकडे उद्योगातील कचरा पाठवावा लागत आहे. या घातक कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची मागणी होत आहे.

कारखान्यांतील कचरा कंपन्या त्यांच्या आवारात, रस्त्यावर किंवा इतरत्र टाकतात. चिंचवड आणि भोसरी एमआयडीसी, चिखली-कुदळवाडी परिसरातील घातक कचऱ्याची महापालिकेकडून योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली जात नाही. शहरातील एमआयडीसी परिसरात एकूण कचऱ्याच्या तुलनेत १० ते १५ टक्के घातक कचरा निर्माण होतो. त्याचे विघटन न करता तो उघड्यावर टाकण्यात येतो. त्यामुळे तो रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पडलेला आढळतो. विशेषतः कुदळवाडी परिसरात याचे प्रमाण जास्त आहे. त्याचप्रमाणे, सायंकाळी कचरा व प्लास्टिक जाळण्यात येते. त्यामुळे प्रदूषण होते. यावर महापालिकेकडून उपाययोजना होत नाहीत. महापालिका प्रशासनाने घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी केवळ उद्योजकांकडून अपेक्षा ठेवणे योग्य नव्हे. घातक कचऱ्याबाबत उपाययोजना करण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. रांजणगाव येथील कंपनीकडे उद्योजकांनी घातक कचरा द्यायचा आहे. त्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. उद्योजक विविध कर भरत असताना त्यांना घातक कचरा संकलनाची सुविधा महापालिका प्रशासनाने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा उद्योजक करत आहेत.

केवळ चर्चा नको, कार्यवाही हवी

औद्योगिक क्षेत्रातील कचऱ्याचे योग्य विलगीकरण होत नाही. त्यावर समन्वयाने काम करून घातक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाईल, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले होते. एमआयडीसीच्या भागातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी केंद्र उभारण्याचा मानस असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यासाठी औद्योगिक कंपन्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याची भूमिका महापालिकेने घेतली होती.

घातक कचरा म्हणजे काय?

घातक कचरा म्हणजे असा अवशेष आहे, जो त्याच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या कोणत्याही सजीवाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो, या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने काच, बॅटरी, सेल्स, रंग, रसायने, तुटलेले बल्ब, ट्यूबलाइट्स, कीटकनाशके, जंतुनाशके आदींचा समावेश होतो.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest