Pimpri Chinchwad News: सकाळ-संध्याकाळ तळवडे रस्त्यावर कोंडी नित्याची!

पिंपरी-चिंचवड: तळवडे आयटी पार्क, चाकण औद्योगिक वसाहत आणि कामगार वास्तव्य असलेला भाग अशा तिहेरी बंधनात तळवडे परिसर अडकला आहे. तळवडे, त्रिवेणीनगर, चिखली या भागात हल्ली वाहतूक कोंडी नित्याची होऊ लागली आहे.

सकाळ-संध्याकाळ तळवडे रस्त्यावर कोंडी नित्याची!

देहू-आळंदी तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता वाहतूक कोंडीने त्रस्त, अवजड वाहनांसाठी वेगळा रस्ता उभारण्याची आवश्यकता

- विकास शिंदे

पिंपरी-चिंचवड: तळवडे आयटी पार्क, चाकण औद्योगिक वसाहत आणि कामगार वास्तव्य असलेला भाग अशा तिहेरी बंधनात तळवडे परिसर अडकला आहे. तळवडे, त्रिवेणीनगर, चिखली या भागात हल्ली वाहतूक कोंडी नित्याची होऊ लागली आहे.  शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी तळवडे परिसरात होऊ लागली आहे. महापालिका प्रशासनही याबाबत कुठलीही ठोस उपाययोजना करत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ‘ही कोंडी कधी सुटणार’ असा सवाल नागरिक करत आहेत.  सकाळ, संध्याकाळी तीन- चार तास वाहतूक कोंडी नित्याची ठरली आहे (Pimpri Chinchwad News)

पिंपरी-चिंचवड शहरालगत असणाऱ्या देहू, आळंदी या दोन तीर्थक्षेत्रांना जोडणारा रस्ता हल्ली वाहतूक कोंडीने त्रस्त झाला आहे. चिखली, टॉवर लाइन, त्रिवेणीनगर, तळवडे गावठाण, ज्योतिबानगर, गणेशनगर परिसरात मोठ्या प्रमाणात कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार राहतात. हे कामगार देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे आले आहेत. (Pimpri Chinchwad Traffic)

तळवडे, महाळुंगे, चाकण एमआयडीसी मधील कंपन्यांमध्ये काम करणारा कामगार वर्ग सहसा दुचाकीवरून तळवडे पार्क मार्गे कामावर जातो. ही दुचाकींची संख्या लक्षणीय आहे. इथे बाहेरून आलेल्या वाहनांच्या संख्येच्या तुलनेत स्थानिक वाहनांची संख्या अतिशय नगण्य आहे. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून चाकणकडे जाण्यासाठी तळवडे येथून जवळचा मार्ग असल्याने या मार्गावर अवजड वाहनांची संख्याही प्रचंड असते. आयटी पार्कमधील कामगारांची वाहने, कामगारांची ने-आण करणाऱ्या बसेस अशा सर्व प्रकारच्या वाहतुकीमुळे तळवडे येथील रस्त्यावर प्रचंड ताण येत आहे.

सकाळी आणि संध्याकाळी सुमारे तीन ते  चार तास वाहतूक कोंडी ही नित्याची ठरली आहे. त्यामुळे या भागातून जाणाऱ्या वाहतुकीला पर्यायी मार्ग आणि वाहतुकीची गती एकसारखी राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची गरज आहे. गणेशनगर येथील रस्ता रुंदीकरणाचे काम रखडले आहे. रस्ते खराब असल्याने वाहतुकीची गती कमी होते. तळवडे ते निगडीपर्यंत रस्ता रुंदीकरण होणे आवश्यक आहे. अतिक्रमण काढून रस्ता तयार करणे तसेच चौकात क्रॉसिंगसाठी अंडरपास, उड्डाणपूल तयार करणे गरजेचे आहे. असे केले तरच तळवडे ते त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक कोंडी सुरळीत होईल.

तळवडे परिसरातील गणेशनगर, ज्योतिबानगर, त्रिवेणीनगर येथे रस्ता अरुंद झाला आहे.  येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडण्यासाठी वाहतूक विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पण, गणेशनगर कॉर्नरवर रुंदीकरण रखडले आहे.  रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे पालिकेने आश्वासन दिले होते. मात्र ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे वाहतुकीची गती मंदावली आहे. चाकण एमआयडीसीकडे जाणारे ट्रेलर रस्त्यात थांबल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होते. पर्यायी रस्ता म्हणून तळवडे-चिखली शिवेवरचा रस्ता झाल्यास फायदा होईल.

- श्रीनिवास बिरादार, स्थानिक नागरिक

निगडी ते तळवडे रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. महापालिकेकडून दोन वर्षांपूर्वीच रस्ता करण्यात आला. पण, तरीही रस्ता खराब आहे. रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावर पार्किंग केले जाते. अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. मुंबईकडून अवजड वाहने याच रस्त्यावरून तळवडे एमआयडीसी, चाकण एमआयडीसीकडे जातात. त्यामुळे अवजड वाहनांसाठी संरक्षण विभागाच्या जागेच्या बाजूने एक रस्ता लवकर होणे आवश्यक आहे. तो रस्ता झाल्यास या रस्त्यावरील वाहतूक कमी होईल. याकरिता महापालिकेने लक्ष घालणे आवश्यक आहे.

- दादासाहेब नरळे, संघटक, शिवसेना (उबाठा गट) भोसरी विधानसभा 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest