Pimpri Chinchwad: महापालिकेचे क्रीडासंकुल समस्यांच्या विळख्यात
महापालिकेच्या कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडासंकुल विविध समस्यांनी ग्रासले आहे. क्रीडासंकुल परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे. या क्रीडासंकुलाची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून अनेक खेळांडू, विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही पुरवण्यात आलेल्या नसल्याने असंख्य अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्वामी विवेकानंद क्रीडासंकुलात विविध समस्यांमुळे तेथील नागरिकांसह खेळाडू विद्यार्थ्यांना पायाभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, खेळांडू विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत आहेत. स्वामी विवेकानंद क्रीडासंकुलात संबंधित देखभाल दुरुस्ती करणा-या ठेकेदारांकडून योग्यप्रकारे साफसफाई होत नाही. सर्वत्र अस्वच्छता असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी क्रीडा विभागाकडे तक्रार केल्यावरही क्रीडा विभागातील संबंधित अधिका-यांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. क्रीडासंकुलात बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. स्वच्छतागृहाची योग्य साफसफाई होत नसल्याने त्याचे गटार झाले असून स्वच्छतागृह तुंबल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना प्रवेश करणेही कठीण झाले आहे.
क्रीडासंकुलात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरल्याने खेळाडू, विद्यार्थ्यांसह संकुलात फिरण्यास येणाऱ्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, कृष्णानगर येथील क्रीडासंकुल परिसरातील समस्यांबाबत तक्रारी करूनही त्याकडे क्रीडा विभाग गांभीर्याने लक्ष देत नाही.
कचऱ्याचा ढिगारा पार केल्यावर खेळाडूंना आणि विद्यार्थ्यांना संकुलात प्रवेश करावा लागतो. संबंधित देखभाल दुरुस्तीचे काम करणा-या ठेकेदाराने स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे.
क्रीडासंकुलात या आहेत समस्या
मुख्य ग्राउंडमध्ये क्रिकेटसाठी सिमेंटचे पीच
इतर खेळाडूंच्या दृष्टीने गैरसोयीचे ठिकाण
अनेक सुविधा आहेत कुलूपबंद
बॅडमिंटन ग्राउंड सहजपणे उपलब्ध होत नाही
शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था नाही, घाणीचे साम्राज्य
आर्किटेक्टच्या चुकीमुळे नवीन शौचालय निर्माण करण्याची वेळ
खेळाडूंना पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही
सुरक्षारक्षक कक्ष कुलूपबंद अवस्थेत
सर्वत्र घाणीचे साम्राज्य
ग्राउंडमध्ये खासगी अकॅडमीची दादागिरी वाढली