पिंपरी-चिंचवड: डॉक्टरांचा हलगर्जीपणा, महिलेची वॉर्डातच प्रसूती

गरोदर महिलेच्या पोटात वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात दाखल केले. तब्बल तीन ते चार तास होऊन त्या महिलेकडे डॉक्टर, परिचारिकेने लक्ष न दिल्याने त्या महिलेची वाॅर्डातील बेडवर प्रसूती झाली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Vikas Shinde
  • Edited By Admin
  • Wed, 10 Jul 2024
  • 12:30 pm

डॉक्टरांचा हलगर्जीपणा, महिलेची वॉर्डातच प्रसूती

पालिकेच्या यमुनानगर रुग्णालयातील प्रकार, संबंधित डॉक्टर, परिचारिकेवर कारवाई

गरोदर महिलेच्या पोटात वेदना होऊ लागल्याने नातेवाईकांनी महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात दाखल केले. तब्बल तीन ते चार तास होऊन त्या महिलेकडे डॉक्टर, परिचारिकेने लक्ष न दिल्याने त्या महिलेची वाॅर्डातील बेडवर प्रसूती झाली. तेथील डाॅक्टर आणि परिचारिकेने दुर्लक्ष केल्याने हा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संबंधित डॉक्टर आणि परिचारिकेची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

या प्रकरणी महिलेचे नातेवाईक दीपक खैरनार यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी तक्रार दिली. त्या तक्रारीत म्हटले आहे की, माझी वहिनी हिना खैरनार यांना निगडीतील महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयातील प्रसूती विभागात सकाळी अकरा वाजता प्रसूतीसाठी दाखल केले होते. यावेळी वहिनीसोबत माझी आई अन्नपूर्णा खैरनार या उपस्थित होत्या. प्रसतिगृहातील डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे हिना खैरनार यांच्या रक्त तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर, त्यांना महिला वॉर्डातील बेड देण्यात आला. दुपारी चार वाजल्यानंतर हिना यांना प्रसूती वेदना होऊ लागल्या. परंतु, रुग्णालयातील कुणीही त्याकडे लक्ष दिले नाही.

तब्बल तीन ते चार तासांपेक्षा जास्त वेळ होऊनदेखील त्रास न थांबल्याने रात्री आठच्या सुमारास दीपक यांच्या आईने रुग्णालयातील डॉक्टर महेश दणाणे यांना सांगितले. मात्र, त्यांनी अजून दोन तास तरी प्रसूतीला लागतील, असे सांगितले. तुम्ही तुमच्या  बेडवर जाऊन बसा, असे आईला सांगितले. यावेळी वॉर्डात अन्य परिचारिका उपस्थित होत्या. यावेळी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हिना यांना प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यानंतर महिला वॉर्डातल्या बेडवरच त्यांची प्रसूती झाली. सुदैवाने माता आणि नवजात बालकाच्या जीविताला गंभीर धोका झाला नाही. दरम्यान, या घडलेल्या प्रकारानंतर नातेवाईकांनी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना संपर्क साधत घडलेला संपूर्ण हकीकत फोनवरून सांगितली आहे. त्यानंतर आयुक्तांनी त्यावर कोणतीही अॅक्शन घेतलेली नाही. त्यामुळे महिलेचे नातेवाईक दीपक खैरनार यांनी महापालिका आयुक्त, वैद्यकीय अधिकारी यांना लेखी तक्रार करत संबंधित डॉक्टर, परिचारिका यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

डॉक्टरांचे दुर्लक्ष, रुग्णांच्या जिवावर बेतले असते
महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालयात महिलेची वाॅर्डातच प्रसूती होऊनदेखील तेथील डॉक्टर आणि परिचारिकेने काहीच सोयरसुतक नाही. त्या रुग्णालयात सायंकाळी वैद्यकीय विभागाचा कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने गर्भवतींची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या रुग्णालयात खासगी ठेकेदार कंपनीचे कंत्राटी डॉक्टर तसेच परिचारिकांच्या मनमानी कारभारामुळे अनेक गर्भवतींच्या जिवावर बेतले आहे. कंत्राटी कर्मचारी वर्गावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालय कंत्राटी ठेकेदाराच्या जिवावर सोडल्याचे दिसून येत आहे.

महिलेची प्रसूती वाॅर्डात होऊनदेखील तेथील डॉक्टर, परिचारिकेवर काही देणे - घेणे नाही. डॉक्टर व परिचारिकेच्या दुर्लक्षाने प्रसूती काळात आई व नवजात बालकास जिवावर बेतले असते. तर काय करायचे होते. रुग्णालयातील दोषी डॉक्टर, परिचारिकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. पण, त्यांच्याकडून या घटनेची माहिती घेऊन त्यांना समज देऊन सोडून दिले आहे.
-दीपक खैरनार, तक्रारदार, नातेवाईक, निगडी

यमुनानगर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराबाबत आम्ही रुग्णालय प्रमुख आणि त्या डॉक्टराचा लेखी खुलासा मागितला आहे. नेमकी वस्तुस्थिती काय आहे. कोणी हलगर्जीपणा केला, याची खातरजमा करून चौकशीअंती जे दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest