संग्रहित छायाचित्र
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर ७२ तासांत शहरातील तिन्ही मतदारसंघात प्रशासनाच्या वतीने सार्वजनिक मालमत्ता व त्यांच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तिपत्रके, भिंतीचित्रे, बॅनर, ध्वज आदी एकूण ७ हजार ६८३ प्रचार साहित्य तत्काळ हटवण्यात आले आहेत, अशी माहिती महापालिका निवडणूक कक्षाचे साहाय्यक आयुक्त अविनाश देशमुख यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौका-चौकांत आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर उभारले आहेत. बेकायदा पद्धतीने उभारलेल्या जाहिरात फलकांवर कारवाई करून ते तातडीने काढून टाकावेत, असे आदेश आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आकाशचिन्ह विभागाला दिले होते. त्यानुसार, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने फ्लेक्स काढले आहेत.
शहरातील तिन्ही मतदारसंघातील कारवाईमध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघात सगळ्यात कमी फ्लेक्सची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सगळ्यात जास्त भोसरी मतदारसंघातल्या फ्लेक्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील फ्लेक्स जप्त केले आहेत. शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातून आचारसंहिता भंगाची एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयातून माहिती दिली. तसेच आचारसंहितेचा भंग होत असेल, तर तातडीने निवडणूक कक्षाला फोन करून, सी-व्हील ॲपवरून अथवा प्रत्यक्ष येऊन तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.