संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदूषण कमी व्हावे, तसेच, पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने वापरण्यास सुरुवात केली आहे. तर कालबाह्य झालेली वाहने भंगारात काढण्यात येणार आहेत. पेट्रोल व डिझेलवरील वाहने वापरणे योग्य नसल्यास तसेच, मुदतबाह्य झालेली वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मुदतबाह्य आणि नादुरुस्त झालेली वाहने भंगारात काढली जात आहेत. त्या वाहनांची संख्या तब्बल २२८ इतकी आहे. त्यात स्वीपर मशिन, कॉम्पॅटर, टिप्पर, ट्रॉली, डिलिव्हरी व्हॅन, वॉटर टँकर, टँकर, डंपर, जीप, अग्निशमन बंब, सुमो, ॲम्बॅसेडर, आदींसह विविध चारचाकी व अजवड वाहनांचा समावेश आहे. शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात वाढत असलेले वायू व ध्वनिप्रदूषण करण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यानुसार महापालिकेने पेट्रोल व डिझेल इंधनावर चालणारी मुदतबाह्य वाहने भंगारात काढण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या मालकीची लहान व मोठी अशी एकूण ४६८ वाहने आहेत. त्यापैकी कोट्यवधी रुपये किमतीची तब्बल २२८ वाहनांना १५ वर्षे पूर्ण झाली असल्याने ती सर्व वाहने भंगारात काढली जाणार आहेत. त्याबाबत एमएसटीसीने कार्यवाही सुरू केली. त्यातील ४९ वाहनांचा लिलावही करण्यात आला आहे. ती वाहने भंगारात विकून त्यांची रक्कम महापालिकेकडे जमा केली जाणार आहे. दरम्यान, उर्वरित अनेक वाहनेही मुदतबाह्य होण्याच्या वाटेवर आहेत. त्यांची क्षमता तपासण्याचे काम सुरू आहे. मात्र, १५ वर्षे मुदत झाली असल्यास आरटीओच्या नियमानुसार ती सर्व वाहनेही भंगारात काढली जाणार आहेत.
ही वाहने झाली कालबाह्य
टोयोटा करोला ३, टाटा मंझा ८, टाटा इंडिका ३, अम्बॅसेडर ४, टाटा सुमो १७, टाटा मोबिलिओ ४, मारुती इस्टीम १, महिंद्रा जीप ३, टेम्पो ट्रॅक्स १, मारुती व्हॅन १, ॲम्ब्युलन्स १, अग्निशमन बंब ४, हैड्रोलिक लॅडर ६, डंपर प्लेसर १, मैला टॅंकर १३, टाटा एसीई लोडबॉडी ४, टाटा ४०७ लोडबॉडी २, टाटा ६०८ लोडबॉडी ४, टाटा ७०९ लोडबॉडी ५, टाटा १२१० लोडबॉडी ४, वॉटर टॅंकर १२, फिरते शौचालय ३१, रोडरोलर १, ट्रॅक्टर ३, ट्रॅक्टर ट्रॉली ५, जेसीबी ३, डॉग स्कॉड ३, डिलिव्हरी व्हॅन १, पोलीस व्हॅन (अतिक्रमण व्हॅन) ४, पॉवर टिलर ट्रॉली १, ट्री कटिंग १, टिप्पर ६, एमजीओ हॉपर रिक्षा ३, कॉम्पॅक्टर २२, स्वीपर मशिन ४, मलजेट ४, नाला क्लिनिंग ४, टाटा एसीई हॉपर ३०, एकूण २८८ वाहने.
२२ चार्जिंग स्टेशन कागदावरच
महापालिकेच्या वतीने इलेक्ट्रिक वाहनांसाठी शहरातील विविध २२ ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार आहेत. वारंवार निविदा प्रसिद्ध करूनही त्या निविदेस ठेकेदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर एका ठेकेदाराने नुकताच प्रतिसाद दिला आहे. मात्र, वर्क ऑर्डर शिल्लक आहे. त्यामुळे महापालिकेचे चार्जिंग स्टेशन अद्याप कागदावरच आहेत. तसेच, महापालिकेकडून इलेक्ट्रिक रिक्षांना ३० हजारांचे अनुदान दिले जाते. त्याचा लाभ अद्याप एकाही रिक्षाचालकाने घेतलेला नाही.
महापालिकेकडे ५१ इलेक्ट्रिक वाहने
महापालिकेच्या वतीने पेट्रोल व डिझेल इंधनावरील वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. महापालिकेकडून इलेक्ट्रिक वाहनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. नव्याने खरेदी करण्यात येणारी तसेच, भाडेतत्त्वावर केवळ इलेक्ट्रिक वाहने घेतली जात आहेत. त्यामुळे ती वाहने वापरण्यात येत आहेत. ही वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. त्या वाहनांची संख्या आणखी वाढवण्यात येणार आहे. कमी वजनाचे साहित्य वाहतुकीसाठी तसेच, शववाहिनीसाठीही इलेक्ट्रिक वाहने वापरण्यात येणार आहेत, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच, पर्यावरण संरक्षणासाठी महापालिकेने इलेक्ट्रिकवर चालणारी वाहने वापरण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोल व डिझेलवरील वाहने वापरणे योग्य नसल्यास तसेच, मुदतबाह्य झालेली वाहने भंगारात काढण्यात येत आहेत. त्या वाहनांचे आरटीओकडून पासिंग केले जात नाही.
- बाबासाहेब गलबले, सह-शहर अभियंता, महापालिका