पिंपरी चिचंवड : दिवाळीच्या तोंडावर लघुउद्योग अडचणीत

दिवाळीच्या तोंडावर शहरातील लघु उद्योगांवर वीज पुरवठा खंडित केला जाण्याची टांगती तलवार आहे. सध्या दिवाळीपूर्वी नियोजित कामे पूर्ण करायची तयारी सुरू आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक उद्योजकांची काम थांबली आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Edited By Admin
  • Sat, 19 Oct 2024
  • 07:27 pm

File Photo

हप्त्याने बील भरण्याची सुविधा पुन्हा चालू करण्याची मागणी

दिवाळीच्या तोंडावर शहरातील लघु उद्योगांवर वीज पुरवठा खंडित केला जाण्याची टांगती तलवार आहे. सध्या दिवाळीपूर्वी नियोजित कामे पूर्ण करायची तयारी सुरू आहे. मात्र, वीज पुरवठा खंडित केल्याने अनेक उद्योजकांची काम थांबली आहेत. यापूर्वी उद्योजकांना देण्यात येणारी विज बिल भरण्याची हप्त्याची सुविधा पुन्हा सुरू करावी अशी मागणी उद्योजकांनी केली आहे. उद्योजकांच्या अडचणी लक्षात घेऊन एखादा महिना चुकल्यास त्याबाबत सहकार्य करावे अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते. अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून तरुण वर्गाला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र शासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याने आधीच विविध समस्येच्या गर्तेत सापडलेले उद्योजक कसेबसे तग धरून आहेत. आता महावितरणने उद्योजकांना लक्ष्य केल्याचे दिसते.

आर्थिक अडचणीचा सामना करतानादेखील लघुद्योगांकडून वीजबील भरण्याची खबरदारी घेतली जात आहे. मात्र कामगारांना दिवाळीचा बोनस व अन्य कारणांमुळे वीजबील वेळेत न भरणाऱ्या  लघुउद्योगाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. त्याऐवजी या लघुउद्योगांना वीजबील सुलभ हप्त्यांमध्ये भरण्याची सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी केली आहे.

परिसरात हजारो इंडस्ट्रीज आहेत. सध्या थकीत वीज बिलामुळे अनेक उद्योग बंद अवस्थेत आहेत. पूर्वी उद्योगांना वीज बिलामध्ये सुलभ हप्त्यांची सवलत होती. सध्या शासनाने ती सवलत बंद केलेली आहे. त्यामुळे अनेक लघु उद्योगावर मोठा गंभीर परिणाम होऊन उद्योग बंद अवस्थेमध्ये गेले आहेत. दिवाळीतही कामगारांना बोनस आणि विविध प्रकारचे खर्च कंपनीवर येत असतात. या काळात वीज बंद झाल्यास उद्योगांचे मोठे नुकसान होते. मोठ्या कंपन्यांकडून दोन ते तीन महिन्याच्या कालावधीत बिलाचे पेमेंट मिळत असते. त्यामुळे लघु उद्योगांना आर्थिक बोजा सहन करावा लागतो. परिणामी खेळते भांडवल मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा इच्छा नसूनही खासगी सावकाराकडून कर्ज उचलावे लागते.

वीज बिलामध्ये सुलभ हप्ते योजना मिळाल्यास लघु उद्योगांना वीज बिल वेळेमध्ये भरता येतील व उद्योग सुरळीत चालू राहतील. महावितरणकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळेही उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. कामगारांना बसून पगार द्यावा लागतो. वीज बिल भरण्यास दिरंगाई झाल्यास त्वरित वीज पुरवठा खंडित करण्यात येतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वीज बिलात हप्त्याने भरण्याची सवलत दिल्यास उद्योजकाना ते सोपे जाईल.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest