पिंपरी-चिंचवड : आयात उमेदवाराचे काम करण्यास नकार

आम्हाला विचारात न घेता कुणाचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यास त्या आयात उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही, असा ठराव पिंपरी-चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या आकुर्डी येथील सेना भवनमधील बैठकीत करण्यात आला.

Refusal,candidate,work,Pimpri-Chinchwad,Shiv Sena Thackeray group,Sena Bhavan

शिवसेना ठाकरे गटाचा ठराव, मोरेश्वर भोंडवे यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध

आम्हाला विचारात न घेता कुणाचा शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश झाल्यास त्या आयात उमेदवाराचे आम्ही काम करणार नाही, असा ठराव पिंपरी-चिंचवड शिवसेना ठाकरे गटाच्या आकुर्डी येथील सेना भवनमधील बैठकीत करण्यात आला. शहराध्यक्ष सचिन भोसले, मावळ लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक संजोग वाघेरे, ज्येष्ठ नेत्या सुलभा उबाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांचा ठाकरे गटात प्रवेश होणार असून  त्या पार्श्वभूमीवर ही बैठक पार पडल्याचे सांगितले जात आहे. भोंडवे यांच्या प्रवेशाला पिंपरी- चिंचवडच्या शिवसैनिकांनी विरोध केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटात जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अनेक इच्छुक नेत्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

या प्रवेशाबाबत पक्षश्रेष्ठींनी स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्यास त्याचे काम करायचे नाही. निष्ठावंत शिवसैनिकांवर हा अन्याय असल्याची भूमिका बैठकीत घेण्यात आली. कुणी पक्ष वाढीसाठी पक्ष प्रवेश करत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो. कुणी उमेदवारीसाठी पक्षात प्रवेश करत असेल तर आम्ही त्या व्यक्तीचं काम करणार नाही, असा सूर बैठकीत होता. याबाबत अधिकृत विचारणा केली असता, बैठक झाली एवढंच पदाधिकारी सांगत आहेत. मात्र, आयात उमेदवाराचे काम न करण्यावर सर्वजण ठाम आहेत.

शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणाऱ्या मोरेश्वर भोंडवे यांना पक्षश्रेष्ठी उमेदवारी देणार का?, की पिंपरी- चिंचवड मधील शिवसैनिकांची पक्षश्रेष्ठी समजूत काढणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

भोसरी, पिंपरीतही आयात उमेदवार

भोसरी विधानसभा मतदार संघातील भाजपाचे माजी बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांनी नुकताच शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघातही काहीजण येत्या काळात महाविकास आघाडीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप निश्चित नाही. भोसरी आणि चिंचवड शिवसेनेला देऊन केवळ पिंपरी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय शहर पातळीवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने घेतला आहे.

जागा वाटप निश्चित नसले तरी आयात म्हणून मोरेश्वर भोंडवे यांचे काम न करण्याचा निर्णय रवी लांडगे यांना देखील लागू होणार का याबाबत चर्चा सुरू आहे. दुसरीकडे शरद पवार गटातून भोसरीसाठी अजित गव्हाणे आणि पिंपरीतून सुलक्षणा शिलवंत हे दोघे आम्हालाच उमेदवारी मिळणार असे सांगत आहेत. त्याचबरोबर चिंचवड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनीही शरद पवार यांची भेट घेतली असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत महाविकास आघाडीत विचार सुरू झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest