संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात गल्लोगल्ली फटाक्यांची दुकाने लागतात. शहरात एक हजारांहून अधिक फटाक्याच्या दुकानांची संख्या आहे. मात्र परवानगी घेतलेल्या अधिकृत फटाक्यांच्या दुकानांची संख्या पाऊणशेच्या आताच आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस यांचे या दुकानांना अभय असल्याचे दिसून येते.
फटाके विक्रीच्या व्यावसायात गुंतवणुकीच्या जवळपास तिप्पट नफा अवघ्या काही दिवसांमध्ये मिळत असल्याने अनेकजण या व्यावसयाकडे वळत आहेत.
मात्र फटाके विक्री करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या अनेक दुकानदार घेतच नाही. त्यामुळे या फटाके विक्री करणार्या दुकानदारांकडून पिंपरी-चिंचवडकरांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. जर महापालिका किंवा पोलीस कारवाईचे निमित्त करून आलेच तर त्यांच्या हातावर शे–पाचशे रुपये टिकवले जातात. त्यामुळे महापालिका आणि पोलीसही अशा दुकानांकडे दुर्लक्ष करतात. पिंपरी-चिंचवडकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप कोणत्याही फटाक्याच्या दुकानाला आग लागलेली नाही. मात्र भविष्यातही अशी घटना घडणार नाही, हे कोणीच छातीठोकपणे सांगू शकत नाही. मात्र भविष्यात नियमांकडे दुर्लक्ष केल्यास काही घटना घडली तर त्यात किती जिवितहाणी किंवा वित्तहाणी होईल, हे सांगता येत नाही. असे असतानाही कोणतीच खबरदारी न घेता गल्लोगल्ली फटाके विक्री जोमात असते.
शहरातील गर्दीच्या ठिकाणी अथवा निवासी इमारतीच्या खाली फटाक्यांची दुकाने थाटली जातात. अशी दुकाने टाकताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले जात नाही. या दुकानांवर कारवाई करण्याचे अधिकारी महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलिसांना असते. सर्व नियमांचे पालन झाले असल्यास अग्निशामक दल या दुकानांना केवळ ना-हरकत प्रमाणपत्र देते. मात्र अशा घटना घडल्यावर केवळ अग्निशामक दलास जबाबदार धरले जाते.
यंदा आतापर्यंत ७७ अर्जांचे वितरण
फटाके विक्री करण्यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेण्यासाठी आतापर्यंत ७७ अर्ज दुकानदारांनी घेतले आहेत. मात्र यापैकी अनेकांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करता येत नसल्याने ते अनधिकृत दुकाने थाटतात. तसेच दुकानाचे आरसीसी बांधकाम आहे का, त्यास लोखंडी शटर आहे का, स्टॉल असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती, बाजूच्या दोन्ही दुकानदारांची नावे व त्यांचे ना-हरकत प्रमाणपत्र तसेच दुकान मुख्य रस्त्यालगत आहे की गल्लीत आहे याची सर्व माहिती अग्निशामक दलास देणे बंधनकारक आहे.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
- मागील वर्षाचा ना-हरकत दाखला प्रत
- मागील वर्षाचा पोलीस परवाना
- यंदाची मिळकतकर भरणा पावती
- दुकानाच्या जागेचा कच्चा नकाशा
- जागा मालकाचा ना-हरकत दाखला
- दुकान असलेल्या सोसायटीचा ना-हरकत दाखला
- अग्निशामक साधने खरेदीचा दाखला