पिंपरी-चिंचवड : दामिनी पथकांचा रोडरोमिओंना दणका

कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दामिनी पथकांनी शहरातील टवाळखोरांना चांगलाच दणका दिला आहे. मागील दोन महिन्यात पथकातील महिला पोलिसांनी दीडशेहुन अधिक टवाळखोरांवर कारवाई केली आहे.

Damini squads

पिंपरी-चिंचवड : दामिनी पथकांचा रोडरोमिओंना दणका

दोन महिन्यांत दीडशेहून अधिक टवाळखोरांवर कारवाई, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात दामिनी पथकांची करडी नजर

कठोर कायदेशीर  कारवाईचा बडगा उगारून पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील दामिनी पथकांनी (Damini squads) शहरातील टवाळखोरांना चांगलाच दणका दिला आहे. मागील दोन महिन्यात पथकातील महिला पोलिसांनी दीडशेहुन अधिक टवाळखोरांवर कारवाई केली आहे. यातील बहुतांश कारवाया शाळा, महाविद्यालयात परिसरात करण्यात आल्या आहेत. (pimpri chinchhwad crime)

उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नोकरीनिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांसह शाळकरी मुलींची मोठी वर्दळ असते. याचा गैरफायदा घेत टवाळखोर मंडळी दिवसभर रस्त्याने घिरट्या घालताना दिसून येतात. 

एकट्या महिला, मुलीकडे पाहून जोरजोरात हॉर्न वाजवणे, शिट्या मारणे, गाणी म्हणणे, अशी कृत्य बेधडकपणे केली जातात. या पार्श्वभूमीवर आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण ३३ दामिनी पथके तयार करण्यात आली आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून ही पथके सक्रिय झाली आहेत. त्यांच्याकडून धडक कारवाया सुरू आहेत. मागील दोन महिन्यात तब्बल १५१ रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. दामिनी पथकांकडून सुरू असलेल्या या कारवाईचे महिलावर्गातून कौतुक होत आहे.

६६ महिला पोलिसांची नजर

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एकूण १८ पोलीस ठाणी येतात. यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात गरजेनुसार दामिनी पथक नियुक्त करण्यात आले आहेत. 

शहर परिसरात एकूण ३३ दामिनी पथक तैनात आहेत. यामध्ये एकूण ६६ महिला अंमलदार कार्यरत आहेत.

तक्रार पेटीतील तक्रारींचे निराकरण

रस्त्याने चालणाऱ्या महिलांसोबत शाळा, कॉलेजच्या मुलींच्या सुरक्षेची जबाबदारी दामिनी पथकावर आहे. मागील दोन महिन्यात दामिनी पथकांनी एकूण ७०३ शाळा, कॉलेजला भेटी दिल्या आहेत. दामिनी पथकाकडून शाळेत असलेल्या तक्रार पेट्या उघडून विद्यार्थिनींच्या समस्येचे निराकरण केले जाते. तक्रार पेटीत आलेल्या २७ विद्यार्थिनींच्या तक्रारींचे दामिनी पथकाने समाधान केल्याची नोंद आहे.

३०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

गस्ती दरम्यान दामिनी पथकांना अनेक गैरप्रकार नजरेस पडतात. त्यानुसार पथकाकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाते. मागील दोन महिन्यात सीआरपीसी ११०, ११२, ११७ नुसार एकूण ३०० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

पुरुष बिट मार्शलसोबत दामिनी पथकही घटनास्थळी

महिलांचे हेल्पलाईन १०९१ किंवा डायल ११२ वर मदतीसाठी कॉल येतात. अशा वेळी हद्दीतील पुरुष बिट मार्शलसोबत दामिनी पथकही घटनास्थळी दाखल होते. मागील दोन महिन्यात एकूण ४४ ठिकाणी दामिनी पथकाने धाव घेत कॉलची पूर्तता केली आहे.

तब्बल एक हजार ६९४ महिलांना मदत...

दामिनी पथकातील महिला पोलिसांची हद्दीत नियमित गस्त सुरु असते. रस्त्यावर एकटे फिरणाऱ्या महिलांकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. तसेच, चौकाचौकात उभे असलेल्या टवाळखोरांवर देखील दामिनी करडी नजर ठेऊन असतात. महिला देखील आवर्जून आपल्या अडचणी दामिनी पथकांकडे मांडतात. त्यानुसार, दामिनी पथकातील महिला पोलीस आवश्यक मदत करतात. मागील दोन महिन्यात गस्तीवर असताना दामिनी पथकाने एक हजार ६९४ महिलांची मदत केल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकीवरून गस्त घातली जाते. रस्त्याने जाणाऱ्या एकट्या महिलांकडे विशेष लक्ष दिले जाते. दामिनी पथकाला पाहून घोळका करून थांबलेले टवाळखोर  मुले पांगतात. अनेक महिला आम्हाला आवर्जून थांबवून तक्रारी मांडतात. त्यांच्या तक्रारी प्राधान्याने सोडवल्या जातात.

-अनिता जारवाल, महिला पोलीस अंमलदार, दामिनी पथक

घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सुरक्षित वाटावे, यासाठी दामिनी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. दामिनी पथके शहर परिसरात नियमित गस्त घालत असतात. दामिनी पथकांच्या कामाचा नुकतेच आढावा घेण्यात आला आहे. गस्ती दरम्यान शेकडो महिलांना दामिनी पथकांनी मदत केली आहे. तसेच, रोडरोमियो आणि टवाळखोरांवर देखील कारवाई केली आहे.

-विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest