पिंपरी-चिंचवड: अँटी सोशल पोस्टवर पोलिसांची खास नजर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'फेक न्यूज' तसेच अँटी सोशल पोस्टवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलद्वारे लक्ष ठेवले जात आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रत्येक हालचालीवर पोलिसांच्या 'सोशल मीडिया सेल'चा' वॉच'; भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाळण्याचे आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'फेक न्यूज' तसेच अँटी सोशल पोस्टवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय स्तरावर सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलद्वारे लक्ष ठेवले जात आहे. या सेलकडून सोशल मीडियातील प्रत्येक पोस्ट, मजकूर, फोटो, व्हीडीओ आणि रेकॉर्डिंगवर 'वॉच' राहणार आहे. त्यामुळे कोणीही चुकीची माहिती पसरवू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे.

निवडणुकीच्या काळात विविध ऑफरसह चुकीचे संदेश व्हायरल होतात. तणाव निर्माण करणाऱ्या पोस्टदेखील शेअर केल्या जात असतात. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुठलाही मजकूर, संदेश खातरजमा केल्याशिवाय फॉरवर्ड, शेअर किंवा पोस्ट करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. जातीवाचक शब्द टाळावेत, धार्मिक किंवा जातीमध्ये वितुष्ट निर्माण होण्याची शक्यता असलेले शब्द टाळावेत. अन्यथा गुन्हा नोंद करत थेट कारवाई करण्यात येणार आहे.

साहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज साहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, साहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक तसेच पोलीस अंमलदार सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलचे कामकाज करत आहेत.

.... येथे करा तक्रार

कोणीही अफवा व खोट्या बातम्या व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल मीडियावर पसरवू नयेत, तसेच त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. काही मदत लागल्यास जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. सायबर गुन्ह्यांबाबतची माहिती www. cybercrime.gov.in या संकेतस्थळावर पाठवावी, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनसाठी नियमावली 

नियमावलीनुसार सदस्यांनी व्हॉट्सअप समूहात अफवा, चुकीची माहिती किंवा दोन समाजात तेढ निर्माण होईल, असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनिचित्रफीत पाठवू नये. त्यासोबत खात्री नसलेले साहित्यही समूहावर पोस्ट करणे टाळावे. अशाप्रकारचे साहित्य समूहात आल्यास डिलिट करावे, ते जसेच्या तसे पुढे पाठवू नये. याशिवाय एखाद्या समाजाचे किवा धर्माविरोधातील साहित्य, पॉर्न साहित्य समूहावर पाठवू नये. ग्रुप अ‍ॅडमिनने वेळोवेळी समूहातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. समूह नियंत्रणाबाहेर जात असेल तर प्रमुखाने सदस्यांचे हक्क काढून घ्यावा आणि समूहावर साहित्य पाठवण्याचा हक्क फक्त स्वतःकडे घ्यावा, समूहावरील आक्षेपार्ह मजकुराबाबत तत्काळ पोलिसाशी संपर्क साधावा, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

"लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल तयार केला आहे. या माध्यमातून सोशल मीडियावर 'वॉच' राहणार आहे. कोणीही चुकीची पोस्ट शेअर, फॉरवर्ड किंवा पोस्ट करू नये. तसेच अफवा पसरवू नये. असे आढळून आल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल."

- संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest