संग्रहित छायाचित्र
किरकोळ वादातून १७ वर्षीय कोवळ्या मुलाने एकावर थेट पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. ही घटना मंगळवारी (३० एप्रिल) तळेगाव दाभाडे येथे घडली. या घटनेमुळे कोवळ्या वयाच्या मुलांमधील गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांवरील गुन्ह्यांचा आढावा घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील पंधरा महिन्यात मिसरूड न फुटलेल्या कोवळ्या मुलांकडून ३५८ गंभीर गुन्हे घडले असून यामध्ये एकूण ४९० मुले अडकल्याची नोंद आहे. (Pimpri Chinchwad Crime)
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांचा काही भाग जोडून पिंपरी- चिंचवड या नवीन आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. १५ ऑगस्ट २०१८ रोजी आयुक्तालयाचा कारभार सुरू करण्यात आला. काही महिन्यातच गुन्हे शाखेची पथके सुरू करण्यात आली. त्यामुळे शहरात पोलिसांचा वावर वाढला. त्यामुळे नामचीन गुन्हेगारी टोळ्यांनी अक्षरशः नांगी टाकली. मात्र, तरीदेखील गुन्ह्यांचा आलेख म्हणावा असा खाली आला नाही. याचे मुख्य कारण म्हणजेच गुन्हेगारी कृत्यांमध्ये नवख्या असलेल्या अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग. यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांचे समुपदेशन वर्ग सुरू आहेत. मात्र, बिघडलेल्या मुलांना शिस्त लागण्यासाठी समुदेशनासोबत आणखी ठोस पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. मागील काही वर्षांपासून शहरातील गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. अल्पवयीन मुलांना शहरातील गुन्हेगार 'आयडॉल' वाटू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यात भाईगिरीची 'क्रेज' मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागली आहे. यातूनच अल्पवयीन मुले खुनासारख्या गुन्ह्यात अडकल्याचे समोर येत आहे.
पालकांचे दुर्लक्ष भोवले ?
बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिशा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाद्वारे अनेक भरकटलेल्या मुलांना दिशा देण्यात आली आहे. मात्र, अलीकडे घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यात अडकलेल्या मुलांचे कसलेही 'रेकॉर्ड' नसल्याचे समोर येत आहे. प्रत्येक वेळी नवीन आरोपी असल्याने त्यांच्यावर जरब बसविताना पोलिसांना मोठ्या अडचणी येत आहेत. बहुतांश गुन्ह्यातील अल्पवयीन आरोपींवर घरातील कोणाचाही धाक किंवा लक्ष नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पालकांनी आपल्या पाल्यावर चांगले संस्कार करून जबाबदारी व्यवस्थित पार पाडल्यास मुलांना गुन्हेगारीपासून रोखता येऊ शकते, असे जाणकार सांगतात.
दहशत निर्माण करण्याचा ट्रेंड
गुन्हेगारी क्षेत्रात नाव कमावण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या नागरिकांच्या गाड्या फोडण्याचा एक नवीन 'फंडा' आला आहे. या गुन्ह्यांच्या तपासात भर रस्त्यावर नंग्या तलवारींचा नाच करीत तोडफोड करणारी अल्पवयीन मुले कुठल्याही गॅंगशी जोडलेली नसल्याचे समोर येत आहे. दारूच्या नशेत असे प्रकार घडत असल्याचे निष्पन्न होत आहे. मागील तीन महिन्यात एकूण आठ तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. यातील निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे तीन ठिकाणी घटना घडल्या आहेत. मागील काही वर्षांच्या तुलनेत या गुन्ह्यांमध्ये कमालीची घट झाली आहे.
पालकांनी संवाद वाढवण्याची गरज
पिंपरी-चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलांवर गंभीर गुन्हे दाखल होत आहेत. त्यामुळे पालकांसह समाजातील जाणत्या व्यक्तींनी मुलांशी संवाद वाढवून सजग राहण्याची आवश्यकता आहे. मुलांच्या हालचालींवर लक्ष देऊन त्यांच्या चुकीच्या सवयींना वेळीच पायबंद घालण्याची गरज आहे. याबाबत पोलीस यंत्रणेकडून वारंवार आवाहन करण्यात आले आहे. मात्र, पालकांकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
सोशल मीडियामुळे गुन्हेगारीला खतपाणी
सोशल मीडियामुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळत आहे. मोबाईलवर पाहिल्या जाणाऱ्या क्रूर व्हीडीओमुळे गुन्हा करण्यास उत्तेजन मिळत आहे. तसेच, 'पॉर्न व्हीडीओ'मुळे मुले वासनांध होऊ लागली आहेत. नुकतेच चाकण परिसरातील गुन्ह्यात मुलाने खून करतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पालकांनी मुलांचा मोबाईल वेळोवेळी तपासला पाहिजे. तसेच, रात्री झोपताना मुलांकडे मोबाईल असणार नाही, याची खबरदारी देखील घेणे आवश्यक आहे.
दररोज एका अल्पवयीन मुलाची गुन्हेगारीत भर
मागील वर्षी ३८६ अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यात सहभाग. मागील वर्षी घडलेल्या २९० गुन्ह्यांमध्ये एकूण ३८६ मुलांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. म्हणजेच सरासरी दररोज एका अल्पवयीन मुलाची गुन्हेगारी क्षेत्रात भर पडत आहे.
तळेगाव येथे घडलेल्या गुन्ह्यामध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. गुन्हेगारी क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलांचे पोलीस प्रशासनाकडून वेळोवेळी समुपदेशन केले जाते. तसेच, दरम्यानच्या काळात झोपडपट्टीत जाऊन मुलांचे समुपदेशन तसेच त्यांच्यासाठी रोजगार निर्मितीसाठी पोलिसांनी प्रयत्न केले आहेत. ज्यामुळे कित्येक भरकटलेली मुले पुन्हा सावरली आहेत. पालकांसह समाजातील प्रत्येकाने जबाबदारी उचलली पाहिजे, तरच अल्पवयीन मुलांना योग्य दिशा मिळून चांगची पिढी निर्माण होईल.
-बापू बांगर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ दोन
१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ दरम्यान ठाणेनिहाय अल्पवयीन मुलांवर दाखल गुन्हे
पिंपरी१५
भोसरी०२
सांगवी०२
चिंचवड१२
निगडी०७
रावेत०२
तळेगाव०७
तळेगाव एमआयडीसी०१
देहूरोड०५
शिरगाव१०
वाकड१३
हिंजवडी०१
चाकण०५
महाळुंगे०१
आळंदी०३
दिघी०१
एमआयडीसी भोसरी१२
चिखली०५
एकूण१०४
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.