मतदानासाठी महापालिका कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर
मावळ तसेच शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्यास असलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदान करता यावे, यासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना मतदान करता यावे, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा काही भाग मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. येत्या १३ मे रोजी या दोन्ही मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक विभागाने जनजागृतीचे अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. नागरिकांनी मतदान करून आपला हक्क बजावावा, यासाठी पालिकेने जनजागृती केली आहे. तसेच या दिवशी औद्योगिक भागातील कंपन्यांमधील कामगारांनादेखील मतदान करता यावे, याकरिता सुट्टी जाहीर करण्याचा आदेश दिला आहे.
या पार्श्वभूमीवर मावळ किंवा शिरूर लोकसभा मतदार संघात वास्तव्य असलेल्या महापालिका सेवेतील कर्मचार्यांना मतदान करता यावे, याकरिता सार्वजनिक सुट्टी देण्याचे परिपत्रक महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढले आहे. पालिकेचे जे कर्मचारी, अधिकारी हॉस्पिटल, अग्निशामक दल, पाणीपुरवठा, सुरक्षा व्यवस्था या अत्यावश्यक सेवेत येतात, ते कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नयेत. त्यांना आपला मतदानाचा अधिकार बजाविता यावा, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.