पिंपरी-चिंचवड : धोकादायक इमारतींसाठी 'कागदी घोड्यां'चा खेळ
पावसाळा सुरू होण्यापूर्वी शहरातील जुन्या इमारतींना पावसाळ्यात धोका निर्माण होतो, अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व आसपासच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तो टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने जुन्या इमारतींची पाहणी केली जाणार आहे. त्यात पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल ८८ इमारती धोकादायक असून त्या इमारतींना महापालिकेने केवळ नोटीस बजावली आहे. त्यामुळे सदरील इमारत पडून नागरिकांच्या जीवितास धोका झाल्यास महापालिका जबाबदारी घेणार आहे का, असा सवाल नागरिक करत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरातील धोकादायक इमारतींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. केवळ कागदी घोडे नाचवले जात असून अधिकाऱ्यांकडून ठोस कार्यवाही केली जात नसल्याचे दिसत आहे. गतवर्षी शहरातील धोकादायक असणाऱ्या इमारतींना फक्त नोटिसा दिल्या. मात्र, अतिधोकादायक इमारती पाडण्याचे धाडस महापालिकेने दाखवले नाही. पावसाळ्यात धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे शहरातील धोकादायक बांधकामे स्वतःहून काढून घ्यावीत किंवा ती तातडीने दुरुस्त करून घ्यावीत, असे महापालिकेच्या बांधकाम परवानगी विभागाच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी सांगितले जाते. तसे जाहीर प्रकटन देऊन वर्षानुवर्षे तेच ते कागदी घोडे नाचवले जात आहेत. मात्र कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे धोकादायक इमारतींचा धोका नागरिकांवर कायम असल्याचे दिसत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जून २०२३ पर्यंत ८८ धोकादायक इमारती व घरे धोकादायक होती. यामध्ये अति धोकादायक १७ इमारती आहेत. त्यांना महापालिकेने केवळ नोटीस दिली. त्यानंतर ८८ पैकी १८ इमारती रिकाम्या करून त्यांची दुरुस्ती केल्याचे सांगितले जात आहे. तर तीन इमारती रिकाम्या न करता दुरुस्ती केली गेली. ६७ इमारतींची किरकोळ दुरुस्ती करण्यात आली आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून सांगितले जात आहे.
दरम्यान, शहरात पावसाळ्यात धोक्याच्या इमारतींमध्ये न राहता दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करणे अधिक योग्य होईल, धोक्याच्या इमारतींबाबत दुरुस्तीसाठी मालक अथवा भाडेकरू यांच्याकडून येणाऱ्या अर्जाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
इमारत कलली, बिल्डरांवर गुन्हाच नाही
वाकड येथील इमारत अचानक कलली होती. दाट लोकवस्ती असलेल्या वाकड भागात बांधकाम करण्यात येत असताना कललेली इमारत अखेर महापालिकेने पाडली. दरम्यान, धोकादायक काम केल्यामुळे विकसकाला नोटीस दिली होती. त्यानंतर गुन्हा नोंद करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र, तीन महिने उलटले तरीही गुन्हा दाखल केलेला नाही. पोलीस गुन्हा दाखल करून घेत नाहीत. आम्ही तीन वेळा जाऊन आलो. पण कोणती कलमाद्वारे गुन्हा दाखल करायचा, असा सवाल पोलीस अधिकाऱ्यांना विचारत आहेत.
जुन्या इमारतींची पाहणी करणार
पावसाळा सुरू होत असल्याने जुन्या इमारतींना पावसाळ्यामुळे धोका निर्माण होतो, अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना व आसपासच्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. तो टाळण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या वतीने जुन्या इमारतींची पाहणी केली जाणार आहे. पावसाळ्यात धोक्याच्या इमारतीमध्ये न राहता दुसरीकडे राहण्याची व्यवस्था करणे अधिक योग्य होईल, धोक्याच्या इमारतींबाबत दुरुस्तीसाठी मालक अथवा भाडेकरू यांच्याकडून येणाऱ्या अर्जाचा प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी धोकादायक असलेल्या इमारती दुरुस्त करणे हे त्या मालकाची जबाबदारी आहे. त्या इमारत नागरिक वास्तव्यास असतील तर त्यांना बाहेर पर्यायी व्यवस्था करावी, तसेच इमारत सुरक्षित राखण्याची जबाबदारी प्रत्येक इमारत मालकाची आहे. त्यासाठी इमारतीची तपासणी तज्ज्ञ अभियंत्यांकडून करून घ्यावी. त्यांच्या सूचनेनुसार इमारत दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करण्यात येते. अन्यथा संबंधित घर मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.