पिंपरी-चिंचवड : 'हा तोतया तहसीलदार कोण?' पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाच्या भिंतीवर चिकटवले पोस्टर, नागरिकांची आर्थिक पिळवणूक केल्याचा आरोप
पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयातील हा तोतया तहसीलदार (Tahsilda) कोण? अशा आशयांचे पोस्टर खुद्द तहसील कार्यालयाच्या दारावरील भिंतीवर चिटकवण्यात आले आहे. त्यामुळे तोतया तहसीलदाराची चर्चा शहरात सर्वत्र सुरु झाली आहे. त्याशिवाय विविध प्रमाणपत्र मंजूरीसाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप देखील पोस्टरमधून केला आहे. (Pimpri Chinchwad New)
पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहात नसल्याने नागरिकांना विविध दाखल्यांसाठी एजंटकडेच धाव घ्यावी लागत आहे. परंतु, एजंटकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असून तहसील कार्यालयात पायपीट करून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच तहसील कार्यालय बाहेर लावलेल्या तोतया तहसीलदार कोण? या पोस्टरवरुन चर्चेला उधाण आले आहे. सध्या सर्वच शाळा, महाविद्यालये सुरू होणार असल्याने शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असते. त्यासाठी नागरिकांना तहसील कार्यालयात जावे लागते. रोज शेकडो नागरिक वेगवेगळ्या भागातून विविध दाखले मिळवण्यासाठी येतात. परंतु, त्यासाठी त्यांना कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. एखादेही कागदपत्र कमी असेल, तरी त्यांना परत केले जात आहे.
दरम्यान, अपर तहसील कार्यालयात हा तहसीलदार कोण? या पोस्टरची जोरदार चर्चा सुरु आहे. तहसील कार्यालय प्रवेशद्वारावरील खांबावर पोस्टर चिटकवण्यात आले आहे. त्यात सदर व्यक्ती ही तहसीलदार पिंपरी चिंचवड यांच्या अधिकारातील नागरिकांच्या विविध प्रमाणपत्रांची मंजुरी कुठलीही कागदपत्र नसताना किंवा कमी असताना आर्थिक रक्कम द्या आणि दाखला करुन घ्या असे म्हणून लोकांची आर्थिक रक्कम घेऊन तहसीलदारांचे दाखल्यांचे अधिकार आणि टेबल माझ्याकडे आहे, असे सांगून पैसे घेऊन प्रमाणपत्र मंजूर करुन देतो, असे सांगू लागल्याचे पोस्टरमधील मजकूरात म्हटले आहे. त्यामुळे तहसील कार्यालयात एजंटाचा कसा सुळसुळाट झाला आहे, यावरुन दिसून येत आहे. याबाबत तहसीलदार जयराज देशमुख यांना तोतया तहसीलदार कोण याविषयी प्रतिक्रिया घेण्यास फोन केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
नागरिकांना हेलपाटे, एजंटाचा रुबाब..
तहसील कार्यालयात एजंटच्या माध्यमातून संबंधितांना आवश्यक असलेले दाखले त्वरित मिळतात. उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर, आर्थिक दुर्बल घटक, संजय गांधी निराधार योजना आदींसाठीची कागदपत्रे, दाखले घेण्यासाठी तहसील कार्यालयात रोजच गर्दी असते. नागरिकांना ७ ते १५ दिवसांतही दाखले मिळणे अपेक्षित आहे. मात्र, काही ज्येष्ठ नागरिक, महिला कार्यालयात येतात. त्यांना अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून योग्य मार्गदर्शन होणे अपेक्षित असते. परंतु त्यांना एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर चकरा माराव्या लागतात. पण, एजंटाने आणलेल्या कागदपत्रांसह विविध प्रमाणपत्र तात्काळ मिळत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कर्मचारी होतात गायब..
पाच दिवसांचा आठवडा झाल्यानंतर शासकीय कार्यालयांच्या वेळाही बदलण्यात आल्या. त्यानुसार सकाळी ९:४५ ला कार्यालय सुरू होणे आणि सायंकाळी ६:१५ पर्यंत कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबणे अपेक्षित आहे. तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांपासून ते कारकुनापर्यत सर्वच कर्मचारी थम्ब (अंगठा) करुन गायब होत आहेत. तसेच तहसील कार्यालयातील शिपाई वगळता अनेक अधिकारी, कर्मचारी नागरिकांचे कामे वेळेत होत नसल्याने नाईजास्तव एजंटाचा आधार घ्यावा लागत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.