संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबवले जात आहेत. शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी मागील शैक्षणिक वर्षात पवित्र पोर्टलमार्फत १०६ माध्यमिक शिक्षकांची भरती झाली. येत्या काही दिवसांत १०३ माध्यमिक शिक्षकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच, गुणवत्तावाढीसाठी २६ कला व ३२ क्रीडा शिक्षकांची नेमल्याचेही त्यांनी म्हटले. शिक्षण विभागाच्या वतीने मुख्याध्यापक, शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यासमवेत संवादसत्र चिंचवडमध्ये पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. आयुक्त सिंह पुढे म्हणाले की, पालिकेच्या ५२ प्राथमिक शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर २६ कला शिक्षकांची नेमणूक केली आहे. या शिक्षकांची प्रशिक्षण कार्यशाळा १३ जून ते १४ जून रोजी घेण्यात येणार आहे. ३२ प्राथमिक शाळांमध्ये ३२ क्रीडा शिक्षकांची प्रायोगिक तत्त्वावर नेमणूक झाली. चालू शैक्षणिक वर्षामध्ये सर्व शाळांमध्ये स्टुडंट कौन्सिलची निवड केली जाईल. तर, जुलै २०२४ पासून मास्टर ट्रेनर हे प्रभागानुसार क्लस्टर मिटिंगचे आयोजन करतील. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून क्यूआर कोड प्रदान करण्यात येणार आहे. डीबीटीद्वारे शालेय साहित्य खरेदी करण्यास कोणतीही अडचण आल्यास या अडचणींचे निरसन करण्यासाठी शिक्षकांसाठी हेल्पलाइन उपलब्ध करून दिली जाईल.
साहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात म्हणाले की, शालेय साहित्यासाठी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३ हजार ७०० रुपये, तर पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी ३ हजार ९०० रुपये रक्कम निश्चित करण्यात आली आहे. शाळा व प्रशासन यांच्यामध्ये सुलभ समन्वय राखण्यासाठी एकूण ११ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. सध्या ९ प्रभारी पर्यवेक्षकांची सेवाज्येष्ठतेनुसार नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. माध्यमिक शाळा व प्रशासन यांच्यातील समन्वयासाठी एक पशिक्षणाधिकारी व २ समन्वयक नेमण्यात आले आहेत. तसेच, गतवर्षी ४० हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली होती. यावर्षी देखील आरोग्य तपासणी होईल, असेही थोरात म्हणाले.
शिक्षकांना बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य
महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये अत्याधुनिक थम्ब मशिन्स बसवण्यात येणार आहेत. जुलै महिन्यापासून सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचाऱ्यांचे पगार बायोमेट्रिक हजेरीप्रमाणे करण्याचे नियोजन आहे, असे विजयकुमार थोरात यांनी सांगितले. तसेच, शालेय गरजेनुसार शैक्षणिक प्रकल्प प्रभावीपणे राबवण्यात यावेत. यासाठी प्रकल्प सल्लागार समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांसाठी २५ समुपदेशकांची नेमणूक केली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.