PCMC News : शाश्वत विकासासाठी ‘सस्टेनेबिलिटी सेल’ची स्थापना

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वसमावेशक विकासकामे करण्यासह पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य देण्यासाठी ‘सस्टेनेबिलिटी सेल’ची स्थापना करण्यात आली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 16 Oct 2024
  • 12:38 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

शाश्वत विकासासाठी ‘सस्टेनेबिलिटी सेल’ची स्थापना

पर्यावरणपूरक कामांना प्राधान्य देणार, स्वतंत्र विभाग स्थापन करणारी राज्यातील पहिली महापालिका

पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देऊन सर्वसमावेशक विकासकामे करण्यासह पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य देण्यासाठी ‘सस्टेनेबिलिटी सेल’ची स्थापना करण्यात आली आहे. ‘सस्टेनेबिलिटी सेल’ची स्थापना करणारी महानगरपालिका राज्यात पहिलीच ठरली आहे.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शहरामध्ये सर्वसमावेशक विकासाला चालना देताना पर्यावरणपूरक बाबींना प्राधान्य देण्यात येणार आहे. ‘सस्टेनेबिलिटी सेल’ची शाश्वत निकषांवर आधारित प्रकल्पांचे मूल्यांकन व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विविध विभागांना सहकार्य व प्रोत्साहन देण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आपले काम करणार आहे. ‘सस्टेनेबिलिटी सेल’ शाश्वतता उद्दिष्टांचे नियमित ट्रॅकिंग, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमतांमध्ये वृद्धी होण्यासाठीचे विविध उपक्रम व तांत्रिक तज्ज्ञ, संशोधन संस्था आणि निधींबाबतच्या विविध स्रोतांसोबत भागीदारी वाढवणे आदी उपक्रम राबवणार आहे. संबंधित उपक्रम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शाश्वतता उद्दिष्टांचे पालन करून शहराच्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय विकासाला प्राधान्य देणारे असून ‘सस्टेनेबिलिटी सेल’ शहराच्या शाश्वत विकासासाठी नवीन अध्याय ठरणार आहे. दरम्यान, ‘सस्टेनेबिलिटी सेल’चे शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य आणि जीवनाची गुणवत्ता सुधारणे हे प्रमुख उद्दिष्ट  असून यामध्ये पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांमध्ये वाढ व सर्वसमावेशक आर्थिक वाढ करून त्यामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवणे व नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे कक्षाचे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. 

नागरिकांचे जीवनमान उंचावणार
‘सस्टेनेबिलिटी सेल’ची रचना नागरिकांच्या राहणीमानासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या सहा महत्त्वपूर्ण घटकांवर लक्ष केंद्रित करून शहराच्या दीर्घकालीन शाश्वत विकासध्येयांना मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात आली आहे. सहा उद्दिष्टांपैकी प्रत्येक क्षेत्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास ध्येयधोरणांशी पुरक असून शाश्वत विकासासाठी ‘सस्टेनेबिलिटी सेल’ उपक्रमाची ध्येये व उपक्रमावर देखरेख ठेवून उपक्रमाच्या उत्तरदायित्वाची यंत्रणा स्थापित करण्यासाठी महानगरपालिकेच्या इतर विभागांशी सहयोग करणार आहे.

‘सस्टेनेबिलिटी सेल’ची ‘ही’ आहेत सहा उद्दिष्टे!

१) पर्यावरण संवर्धन; शहरामधील नागरिकांना उत्तम आरोग्याच्या सेवा देण्यासाठी हवा व पाणी यांच्या गुणवत्तेचे व्यवस्थापन करून जैवविविधतेचे जतन व कचऱ्याचा पुनर्वापर करण्याची प्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेणे

२) शाश्वत वाहतुकीमध्ये गतिशीलता; सार्वजनिक वाहतुकीचे विद्युतीकरण, सार्वजनिक रस्त्यांवर स्वतंत्ररीत्या सायकलिंग व चालण्याचे मार्ग विकसित करणे

३) शाश्वत शहरी प्रदेश; यामध्ये शहरात हिरव्या इमारती, हिरव्यागार सार्वजनिक जागांची निर्मिती व पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे

४) आपत्तीकालीन लवचिकता; शहरामध्ये आपत्तीकालीन घटनांवर उपायाकरिताच्या जोखिमांचे मूल्यांकन व त्याबाबत आपत्कालीन तयारी करणे. शहरात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यावश्यक लवचिक पायाभूत सुविधांची निर्मिती करून त्या उपलब्ध करून देणे

५) सामाजिक विकास आणि सर्व घटकांचा विकासामध्ये समावेश : शहराच्या विकासामध्ये सामाजिक विकासाच्या तत्त्वाला प्राधान्य देऊन त्यामध्ये लिंग समानता आणणे. त्याबरोबर त्यांचे कौशल्य विकासामध्ये समुदायाचा अंतर्भाव करणे

६) शाश्वत अर्थव्यवस्था निर्माण करून नव्या उपक्रमांस प्राधान्य : शहराच्या अर्थसंकल्पामध्ये हवामान अंदाजपत्रक, ग्रीन बॉण्ड्स, शाश्वत निधीसाठी भागीदारी करणे


पिंपरी-चिंचवड शहराच्या शाश्वत विकास व सर्वांगीण वृद्धीसाठी ‘सस्टेनेबिलिटी सेल’ महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ‘सस्टेनेबिलिटी सेल’ प्रत्येक प्रकल्पाची माहिती आधारित निरीक्षणाच्या माध्यमातून प्रकल्पाच्या मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करणार आहे. सदर प्रकल्प समाजासाठी व पर्यावरणासाठी दीर्घकाळ टिकणारे व त्यापासून फायदे आहेत की नाही, याची खात्री करणार आहे. त्यामुळे ‘सस्टेनेबिलिटी सेल’ इतर विभागांना जोडला जाऊन त्यामध्ये शाश्वत प्रक्रिया स्थापित करणार आहे.
- शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest