संग्रहित छायाचित्र
पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना वृक्षारोपणाची चळवळ वाढवणे गरजेचे आहे. याकरिता पर्यावरणप्रेमींकडून जनजागृती केली जाते. त्यासाठी वृक्षारोपणासारखे उपक्रम हाती घेतले जातात. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध विकास कामांत अडथळा ठरत असलेली तब्बल ९६१ झाडे मूळ ठिकाणांवरून हटवणार आहे. त्या बदल्यात केवळ ९०३ वृक्षांचे इतरत्र पुनर्रोपण केले जाणार आहे. तर इतर झाडांची छाटणी केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात विविध विकास कामे केली जात आहेत. तेथे झाडे असल्यास काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अशी झाडे हटविण्याची कार्यवाही महापालिकेकडून केली जात आहे. त्या अंतर्गत ९६१ झाडे हटवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत रस्ते, औद्योगिक परिसरातील रस्ते विकसित करण्यासाठी मधोमध असणारी झाडे हटवण्यात येणार आहेत.
यासह अनेक खासगी जागा मालकांनी त्यांच्या घरगुती कामासाठी झाडे हटवण्याची परवानगी मागितली आहे. त्यानुसार, महापालिका कार्यवाही करणार आहे.
दरम्यान, यामध्ये पिंपळ, नारळ, कडुनिंब, आंबा, अशोक, गुलमोहर आदींसह विविध प्रकारच्या झाडांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यापैकी केवळ ९०३ झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. उर्वरित झाडांचे पुनर्रोपण शक्य नसल्याने ते केले जाणार नसल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
पुनर्रोपणामुळे झाडांच्या आयुर्मानात घट ?
मूळ ठिकाणावरून झाड हटवून इतर ठिकाणी पुनर्रोपण केल्यास त्या झाडाचे आयुर्मान कमी होण्याची शक्यता अधिक असते, असे पर्यावरणप्रेमी सांगतात. त्यामुळेच जेवढी झाडे जागेवरून हटवण्यात येत आहेत. त्याच्या दुप्पट तरी इतर झाडे लावणे आवश्यक आहे. मात्र, महापालिका प्रशासन त्याबाबत उदासीन दिसत आहे.
पर्यावरण मित्रांची अनास्था
विकास कामे करण्यासाठी झाडे हटवण्यात येणार आहेत. कोणाला आक्षेप असल्यास लेखी कळवण्याचे आवाहन महापालिकेच्या उद्यान विभागाने केले होते. मात्र, एकाही पर्यावरण प्रेमी अथवा वृक्ष मित्राकडून त्यावर आक्षेप नोंदवण्यात आला नाही, असा दावा महापालिकेने केला आहे.
विकासकामांसाठी हटवण्यात येणारी झाडे- ९६१
पुनर्रोपण करण्यात येणारी झाडे- ९०३
छाटणी होणारी झाडे-७