पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या 'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग' उपक्रमाला हजारांहून अधिक सूचना; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महापालिकेच्या'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग' उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, हजारांहून अधिक सूचना प्राप्त.'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग' या महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग' या महापालिकेच्या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत पालिकेला तब्बल एक हजारांहून अधिक सूचना प्राप्त झाल्या आहेत.  या उपक्रमांतर्गत नागरिकांना शहरातील विविध प्रश्न, उपाययोजना, प्रकल्प यासाठी अगदी घरबसल्या आपला सहभाग नोंदवता येत आहे. यामुळे नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून पालिकेच्या सारथी ॲपवरून अर्ज करावा,  असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग' या उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत पिंपरी-चिंचवड परिसरातील अनेक महाविद्यालयांना भेटी देण्याचे काम सुरू असून त्यांच्या प्रतिनिधींमार्फत प्रत्यक्ष वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना या उपक्रमाचे महत्त्व समजावून सांगण्यात येत आहे.

महापालिकेतर्फे रस्ते, उद्याने, पाणीपुरवठा आणि इतर सुविधा कशा पुरवल्या जातात?, त्यासाठीचे आर्थिक निर्णय कसे घेतले जातात?, या सर्व गोष्टींसाठी अर्थसंकल्प कसे आवश्यक असतो, विद्यार्थ्यांनाही या प्रक्रियेत कशी महत्त्वाची भूमिका बजावता येते, या सर्वांची इत्थंभूत माहिती देऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची विचारक्षमता वापरायचीही उत्तम संधी असल्याने हे विद्यार्थी वर्गातच तिथल्या तिथे क्यूआर कोड स्कॅन करून आपल्या परिसरातील सुविधा तसेच प्रश्नांबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

या जनजागृती मोहिमेसाठी पालिकेकडून सकाळी कचरा गोळा करणाऱ्या जवळपास ५०० घंटागाड्यांचा देखील प्रभावीपणे वापर  केला जात आहे.  या गाड्यांमार्फत शहरातील प्रत्येक गल्लीत आणि मोहल्ल्यात 'अंदाजपत्रकात नागरिकांचा सहभाग'  या जनजागृती मोहिमेची प्रचारधून ऐकू येत आहे. या घंटागाड्यांमार्फतही क्यूअर कोड स्कॅन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विविध औद्योगिक कंपन्या, सरकारी कार्यालये, रुग्णालये यापासून ते थेट मजूर अड्डे तसेच जन्माष्टमी निमित्त विविध मंदिरांमध्ये होणारी गर्दी, दहीहंडी निमित्त रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात उतरणारे नागरिक तसेच पालिकेच्या दर सोमवारी आयोजित केल्या जाणाऱ्या जनसंवाद सभांच्या गर्दीचा देखील प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेण्यात येत आहे. सोशल मीडिया प्रचार तंत्राचा प्रभावी वापर हे देखील या जनजागृती मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले असून त्याद्वारे पिंपरी-चिंचवडमधील तब्ब्ल १५ लाख नागरिकांपर्यंत ही मोहीम पोहोचवण्यात पालिकेला यश आले आहे.

शहराचा विकास साधण्यासाठी नागरिकांच्या सूचना महत्त्वाच्या आहेत. तरी, पिंपरी-चिंचवडमधील जास्तीतजास्त  नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन आपल्या मागण्या ॲपद्वारे नोंदवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest