महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीची इमारत कात टाकत असून, नव्याने उभारलेल्या बिल्डिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहरात पीएमआरडीए कार्यालय इमारतीनंतर ही दुसरी इमारत ग्रीन म्हणजेच पर्यावरणपूरक असण्याचा मान मिळणार आहे. पार्किंग, पोडियम व त्यावरती चार मजली इमारत असे स्ट्रक्चर असणार आहे. लवकरच या ठिकाणी सर्व विभाग एकत्र येऊन कामकाज सुरू होईल. त्यामुळे उद्योजकांना विविध कामासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चिंचवड स्टेशन परिसरातील जुन्या इमारतीची क्षमता संपुष्टात आली आहे. तसेच एमआयडीसीचा वाढता ताण आणि त्या अनुषंगाने वाढलेले विभाग यासाठी हे कार्यालय अपुरे पडत होते. त्यामुळे नवी इमारत उभारण्याचा मानस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. आता जुनी इमारत पाडली असून, या ठिकाणी नवी इमारत उभारण्यात आली आहे. तेथून उद्योजकांना विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यामुळे एमआयडीसी विकासाला हातभार लावेल.
उद्योगांची झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता १९६० मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एम आय डी सी) कार्यालयाची स्थापना करण्यात आली होती. चिंचवडमधील या कार्यालयाच्या बैठ्या एकमजली इमारतीत विविध विभागीय, उपविभागीय कार्यालये, लेखा व वित्त विभाग असे विभाग विखुरलेल्या स्वरूपात होते. त्यात २०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत.
या जुन्या इमारतीमधून पिंपरी-चिंचवड, तळेगाव, चाकण, उपविभागीय कार्यालयाच्या औद्योगिक क्षेत्राचे कामकाज चालत होते. या सर्व औद्योगिक क्षेत्रांसाठी मूलभूत सुविधा, औद्योगिक क्षेत्रामधील भूखंडांसाठी इमारत परवाना, भोगवटा प्रमाणपत्र, पाणीपुरवठा अशी कामे केली जात होती. या इमारतीला तब्बल ६० वर्ष झाली असून तिची क्षमता संपल्यामुळे ती पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या ठिकाणी अद्यावत इमारत बांधण्यात आली असून, त्याचे जवळपास ७० ते ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. या इमारतीसाठी जवळपास २१ कोटी खर्च अपेक्षित आहे. लवकरच या ठिकाणी सर्व विभाग एकत्र येणार असून, एकाच ठिकाणी उद्योजकांची कामे पूर्ण होणार आहेत.
अशी असेल इमारत
बांधकाम पर्यावरणपूरक
सांडपाणी, पावसाचे पाण्याचा पुनर्भरण प्रकल्यामुळे पुनर्वापर
छतावर सोलर पॅनल बसवणार
इमारतीत स्टील्ट पार्किंग,
पोडियम, चार मजले अशी रचना
कार्यालय सुटसुटीत,
नागरिकांना दिसेल अशा जागी