पिंपरी-चिंचवड : संभाव्य धोकादायक ठिकाणी उपाययोजना

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची सर्व आपत्कालीन यंत्रणा दक्ष असून धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे

Pimpri Chinchwad News

पिंपरी-चिंचवड : संभाव्य धोकादायक ठिकाणी उपाययोजना

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांच्या सूचना

संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी महापालिकेची सर्व आपत्कालीन यंत्रणा दक्ष असून धोकादायक ठिकाणांची पाहणी करून त्या अनुषंगाने संबंधित विभागांमार्फत तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी दिल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या नद्यांवर असलेल्या धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली असून ते पूर्ण भरण्याच्या स्थितीत आहेत. तसेच येत्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशावेळी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संभाव्य अतिवृष्टीच्या अनुषंगाने पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येत आहे.  स्थलांतरित ठिकाणी आवश्यक सुविधा, भोजन तसेच वैद्यकीय सेवा आदी बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापनही करण्यात येत आहे. तसेच पूर परिस्थिती उद्भवल्यास ती हाताळण्यासाठी संभाव्य धोक्याच्या ठिकाणांची पाहणी करून त्यावर संबंधित विभागामार्फत तातडीने उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती महापालिका अतिरिक्त आयुक्त चंद्रकात इंदलकर यांनी दिली.  

नदीकाठच्या नागरिकांसाठी सूचना

-अतिवृष्टीच्या अनुषंगाने नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे.

-कोणीही नदीपात्रात उतरू नये.

-वीजेचे खांब, डी. पी. बॉक्स, ट्रान्सफॉर्मर अशा विद्युत उपकरणांजवळ जाऊ नये.

-नदीपात्राजवळ किंवा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये अथवा फोटोग्राफी करू नये.

-आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.

-पूरबाधितांसाठी महापालिकेच्या वतीने निवारा केंद्रांची सोय केली आहे.  

-गरज असेल तरच घराबाहेर पडावे.

-अफवांवर विश्वास न ठेवता महापालिका व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

-नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी.

-कोणतीही आपत्ती उद्भवल्यास महापालिकेच्या नियंत्रण कक्षास संपर्क साधावा. 

Share this story

Latest