मतसंग्राम 2024 : महेश लांडगे नको म्हणत चौघे रिंगणात

राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करताना प्रत्येक मतदारसंघातील हेवेदावे समोर येत आहेत. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार महेश लांडगे हेच उमेदवार असल्याचे निश्चित झालेले आहे.

मतसंग्राम 2024 : महेश लांडगे नको म्हणत चौघे रिंगणात

भोसरीत महायुती एकसंध मात्र महाविकास आघाडीमध्ये चार इच्छुक, कोणाला उमेदवारी मिळणार हा कळीचा प्रश्न

राज्य विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करताना प्रत्येक मतदारसंघातील हेवेदावे समोर येत आहेत. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार महेश लांडगे हेच उमेदवार असल्याचे निश्चित झालेले आहे. त्याचे कारण म्हणजे भोसरीत राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातून कोणी उमेदवारच इच्छुक नाही. 

भोसरीतील अन्य पक्षांचा महेश लांडगे यांना विरोध असल्याने लांडगे नको म्हणत महाविकास आघाडीमधून अजित गव्हाणे, सुलभा उबाळे, रवी लांडगे तसेच माजी आमदार विलास लांडे या चार इच्छुकांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या चौघांनी आमच्यातील कोणाही एकाला उमेदवारी दिली तरी अन्य तिघेजण त्याचे काम करू, अशी ग्वाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

आघाडीतील बिघाडी आणि अधिकृत उमेदवाराविरोधात जाऊन अपक्ष निवडणूक लढवत विजय संपादन करण्याची भोसरी विधानसभा मतदारसंघाची परंपरा आहे. त्यामुळे यंदाही महाविकास आघाडीमधून  एकाला उमेदवारी मिळाल्यानंतर अन्य तिघांपैकी एखादा उमेदवार अपक्ष निवडणूक लढविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२००८ मध्ये मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर भोसरी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. पिंपरी-चिंचवड शहरावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यावेळी एकहाती  सत्ता होती.  भाजप आणि शिवसेना त्याचबरोबर काँग्रेसला मानणारा वर्ग त्यावेळी शहरामध्ये अस्तित्वात होता. २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीकरिता माजी महापौर मंगला कदम यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून भोसरी विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती. दुसरीकडे शिवसेनेकडून माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांना उमेदवारी दिली गेली. परंतु ऐनवेळेस माजी महापौर विलास लांडे यांनी राष्ट्रवादीमधून बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवली. भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार म्हणून त्यांचा अवघ्या दीड हजार मतांनी विजय झाला होता. सुलभा उबाळे यांचा निसटता पराभव भाजप-शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता.

भोसरीच्या आसपासची समाविष्ट गावं, या गावांचा रखडलेला विकास, येथील पिण्याचे पाणी, शहराचा एकत्रित होणारा कचरा मोशी येथे आणून डेपोमध्ये टाकणं, भोसरी एमआयडीसी अन् या परिसराला लागून असणारी चाकण एमआयडीसी, सैन्य दलाशी संबंधित काही परिसर, वारकऱ्यांच्या किंबहुना महाराष्ट्राच्या अस्मितेचा मुद्दा असलेली आळंदी वारीचा मार्ग अशा अनेक बाबींनी भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे पाहिले जाते.

२०१४ मध्ये भाजपची लाट असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन नगरसेवक महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत मोठ्या मताधिक्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांचा पराभव करीत विजय मिळवला होता. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार आल्यावर महेश लांडगे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारून आपला पाठिंबा पक्षाला दिला होता.

विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर २०१७ मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. यावेळी देशातला पहिला भाजपचा बिनविरोध नगरसेवक म्हणून रवी लांडगे हे विजयी झाले होते. मात्र आज याच रवी लांडगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला असून, ते देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप या आमदार जोडीने महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असलेली अनेक वर्षांची सत्ता हिसकावून घेतली. शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये भोसरी आणि चिंचवड या दोन ठिकाणी भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्याचे काम आमदार महेश लांडगे आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले.

त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवीत दुसऱ्यांदा विजय संपादन केला. शहरात भाजप रुजविणारे त्याचबरोबर शहराध्यक्ष अंकुशराव लांडगे यांच्या हत्येचा बदला घेतल्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल असणारे माजी नगरसेवक एकनाथ पवार यांना भाजपने २०१९ मध्ये उमेदवारी नाकारली.  त्यामुळे आज याच एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला असून, ते पिंपरी-चिंचवड मधील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक न लढविता आपल्या मूळ गावी जाऊन निवडणूक लढवीत आहेत.

अंकुशराव लांडगे यांचे पुतणे रवी लांडगे त्याचबरोबर एकनाथ पवार यांच्यासह भाजपच्या काही जुन्या सहकाऱ्यांनी महेश लांडगे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप करीत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये जातीपातीच्या राजकारणापेक्षा गावकी-भावकीच्या राजकारणावर निवडणूक लढवली जाते.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील सर्वच उमेदवार म्हणजे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, महाविकास आघाडीमधून सध्या तरी प्रबळ दावेदार असणारे माजी स्थायी समिती सभापती अजित गव्हाणे, रवी लांडगे हे सर्वच एकमेकांचे नातेवाईक आहेत. २०१४ मध्ये भाजपकडून एकनाथ पवार शिवसेनेकडून सुलभा उबाळे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विलास लांडे निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. महेश लांडगे यांनी अपक्ष निवडणूक लढवीत सर्व पक्ष्यांच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव केला होता. त्यानंतर मागील पंचवार्षिकमध्ये मात्र महेश लांडगे यांनी भाजपची उमेदवारी घेतल्यावर शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाला लांडगे यांच्या विरोधामध्ये उमेदवार देता आला नाही. माजी आमदार विलास लांडे यांनीही राष्ट्रवादीचे चिन्ह न घेता अपक्ष निवडणूक लढविली. मात्र महेश लांडगे यांचा पराभव करण्यात लांडे यांना यश आले नाही.

दोन वेळा नगरसेवक, स्थायी समिती सभापती ते सलग दहा वर्ष आमदार असा प्रवास असणाऱ्या महेश लांडगे यांना आता मात्र सर्व स्तरांमधून विरोध होताना दिसत आहे. महापालिका किंवा राज्य शासनामार्फत नियोजित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सर्व प्रकल्पांना मंजुरी मिळवून घेताना आमदार लांडगे यांनी केवळ भोसरी विधानसभा मतदारसंघाचा विचार करीत अनेक प्रकल्प पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातून स्वतःच्या भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे वळविल्याचे दिसून येते.

पोलीस आयुक्तालयाची नियोजित प्रशासकीय इमारत, न्यायालयाची नियोजित प्रशासकीय इमारत, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची नवीन शाखा, परिवहन कार्यालय, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा, बायोडायव्हर्सिटी पार्क यासह अनेक प्रकल्प ज्याची एकत्रित किंमत सुमारे दीड ते दोन हजार कोटीच्या आसपास आहे, हे सर्व प्रकल्प एकट्या भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये नेऊन एक प्रकारे चिंचवड आणि पिंपरीकडे कानाडोळा केल्याचे दिसून येते. या प्रत्येक नियोजित प्रकल्पामध्ये आणि काही अपूर्ण असलेल्या प्रकल्पामध्ये आमदार लांडगे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप अजित गव्हाणे, रवी लांडगे, सुलभा उबाळे करताना दिसत आहेत.

मतदारसंघातील समस्या 

भोसरी-आळंदी रस्त्यावरील वाहतूक कोंडी, समाविष्ट गावांमधील सोयी सुविधांची वानवा, मोशी कचरा डेपोचे स्थलांतर, प्राधिकरणाची घरे फ्री होल्ड करणे, साडेबारा टक्के परतावा, मोशी कन्वेंशन सेंटरचे रखडलेले काम, तळवडे आणि आसपासच्या परिसरातील रेड झोनचा प्रश्न, इंद्रायणी नदी प्रदूषण या काही प्रमुख समस्या भोसरी विधानसभा मतदारसंघात २००९ पासून कायम आहेत.

विलास लांडेंचे चाललंय काय?

राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे पुत्र माजी नगरसेवक विक्रांत लांडे हे अजित पवार यांच्यासमवेत होते. मात्र अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असणारे अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर आता त्यांचे नातेवाईक असणारे आणि आमदार महेश लांडगे यांचे राजकीय विरोधक असणारे माजी आमदार विलास लांडे हेदेखील शरद पवार गटात प्रवेश करू शकतात. नुकतीच त्यांनी पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेतली. मात्र सुरुवातीपासून "माझ्या देव्हाऱ्यांमध्ये शरद पवार यांचा फोटो आहे. पण, मी अजित पवार यांच्या समवेत आहे", असे विलास लांडे सांगत आले आहेत. त्यामुळे विलास लांडे यांचे नेमके चाललंय काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

कोणालाही उमेदवारी दिली तरी आम्ही एकत्र

भाजपा सोडून शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केलेले माजी बिनविरोध नगरसेवक रवी लांडगे यांनी देखील नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. अजित गव्हाणे, सुलभा उबाळे, मी अथवा नव्याने पुन्हा घर वापसी करण्याच्या तयारीत असणारे विलास लांडे यापैकी तुम्ही कोणालाही उमेदवारी द्या, महाविकास आघाडी म्हणून मी त्याचाच प्रचार करेन, असे रवी लांडगे हे शरद पवार यांना सांगून आले आहेत. माजी आमदार विलास लांडे आणि आमदार महेश लांडगे या दोघांना मागील दोन निवडणुकीमध्ये टक्कर देणाऱ्या सुलभा उबाळे यांनीच रवी लांडगे यांना मातोश्रीवर नेत शिवबंध बांधले होते. त्यानंतर अजित गव्हाणे हे अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार गटात आले आहे. त्यामुळे या तिघांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच होण्याची शक्यता असतानाच माजी आमदार विलास लांडे यांनीही शरद पवार यांची भेट घेतल्याने या चौघांपैकी नेमकी उमेदवारी कोणाला मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

२००९ 

विलास लांडे - अपक्ष - ५०,४७२

सुलभा उबाळे - शिवसेना - ४९,२००

मंगला कदम - राष्ट्रवादी काँग्रेस - २६,७९८

२०१४ 

महेश लांडगे - अपक्ष - ६०,१७३

सुलभा उबाळे - शिवसेना - ४४,८५७

विलास लांडे - राष्ट्रवादी काँग्रेस - ४४,२१९

एकनाथ पवार - भाजपा - ४३,६२६

हनुमंत भोसले - काँग्रेस - १४,३६३

 २०१९ 

महेश लांडगे - भाजपा - १,५९,२९५

विलास लांडे - अपक्ष - ८१,७२८

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest