पिंपरी-चिंचवड: शहरात १७ हजार ५०० घरात डेंग्यूच्या अळ्या

पिंपरी-चिंचवड : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत १७८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चिकुनगुनियाचे ३४ रुग्ण आहेत. शहरातील १७ हजार ५०० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. संबंधित घरमालकांकडून तसेच इतर ठिकाणांहून एकूण ७७ लाख ४८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 07:30 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

आजअखेर ७७ लाख ४८ हजारांचा दंड वसूल

पिंपरी-चिंचवड : शहरात डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असून, आतापर्यंत १७८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. चिकुनगुनियाचे ३४ रुग्ण आहेत. शहरातील १७ हजार ५०० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. संबंधित घरमालकांकडून तसेच इतर ठिकाणांहून एकूण ७७ लाख ४८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात जूनपासून डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. ठिकठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती हाेण्यास पाेषक वातावरण निर्माण हाेत आहे. डासांमुळे अनेकांना डेंग्यू, मलेरिया, झिका व चिकुनगुनिया या आजारांची लागण होत आहे. या आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. आतापर्यंत नऊ लाख १० हजार ९९८ घरांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७ हजार ४५६ घरांत डासांच्या अळ्या आढळल्या आहेत.

शहरातील दुकाने, व्यावसायिक ठिकाणे, मोकळ्या जागा अशा ४१ लाख ४५ हजार ८१८ ठिकाणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २२ हजार ३११ ठिकाणी डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. शहरातील २६४९ वाहन दुरुस्ती, भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. २५३६ बांधकाम प्रकल्प तपासण्यात आले. त्यापैकी ३७९१ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे, तर १७८५ जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यातून एकूण ७७ लाख ४८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरात डेंग्यू रुग्णांची वाढ होत असल्यामुळे कंटेनर सर्वेक्षणाची मोहीम सुरू आहे. शहरातील बांधकाम प्रकल्प, घरे तपासण्यात येत आहेत. डेंग्यूच्या अळ्या सापडल्या, तर नागरिकांना नोटीस देण्यात येत असून दंडही वसूल केला जात आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही स्वच्छ पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे साहाय्यक आयुक्त अजिंक्य येळे यांनी केले. आतापर्यंत ३६ हजार २७९ जणांची तपासणी केल्यानंतर ४३१३ जण डेंग्यू संशयित आढळले हाेते. 

त्यापैकी १७८ जणांना डेंग्यूचे निदान झाले आहे. १६०८ जणांची तपासणी केल्यानंतर ३४ जणांना चिकुनगुन्याचे निदान झाले आहे. या वर्षी चाचण्यांचे प्रमाण माेठ्या प्रमाणात वाढविले आहे. डेंग्यूची रुग्णसंख्या गेल्या वर्षीपेक्षा कमी असल्याचे आराेग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest