पिंपरी-चिंचवड: मेट्रोच्या अर्धवट कामांचा नागरिकांना अडसर, पादचारी पुल, जिन्याचे बांधकाम अपूर्णच

पिंपरी-चिंचवड: पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोला तब्बल दोन वर्षे झाली. प्रवासी संख्येतही वाढ होत आहे तरी अजूनही मेट्रो स्थानकात जाण्यासाठी एका बाजूला पादचारी पुलाचे आणि जिन्याचे बांधकाम अपूर्ण आहे. एकीकडे मेट्रोने लिफ्ट, सरकते जिने यासह दोन ठिकाणी रॅम्प उभारले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 4 Oct 2024
  • 06:36 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

मेट्रोच्या अर्धवट कामांचा नागरिकांना अडसर

एकीकडे सुशोभीकरण तर, दुसरीकडे विद्रुपीकरण

पिंपरी-चिंचवड: पीसीएमसी ते सिव्हिल कोर्ट या दरम्यान सुरू असलेल्या मेट्रोला तब्बल दोन वर्षे झाली. प्रवासी संख्येतही वाढ होत आहे तरी अजूनही मेट्रो स्थानकात जाण्यासाठी एका बाजूला पादचारी पुलाचे आणि जिन्याचे बांधकाम अपूर्ण आहे. एकीकडे मेट्रोने लिफ्ट, सरकते जिने यासह दोन ठिकाणी रॅम्प उभारले आहेत. मात्र, दुसरीकडे अर्धवट बांधकाम आणि उभारलेले पिलर अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे एकीकडे सुशोभीकरण तर, दुसरीकडे विद्रुपीकरण होत आहे.

सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो सेवेचा रविवारी (दि. २९) प्रारंभ झाला. त्यामुळे आता थेट पिंपरी ते स्वारगेटपर्यंत प्रवास करता येणार आहे. मेट्रो प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रवाशांची संख्या आता ५० हजार पुढे गेली आहे. पीएसएमसी हे सुरुवातीचे स्थानक असल्यामुळे या स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. या मेट्रो स्थानकावर ये-जा करण्यासाठी चार पादचारी पुलांची मंजुरी आहे. मेट्रो प्रशासनाने यासाठी महापालिकेची जागा ताब्यात घेतली आहे. मात्र जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पुण्याच्या दिशेने मोरवाडी चौकात, महापालिका भवनसमोर आणि निगडीच्या दिशेने मोरवाडी चौकात लिफ्ट आणि जिना बांधला आहे. मात्र निगडीच्या दिशेने महापालिकेच्या समोरील बाजूस जागा ताब्यात घेऊन अर्धवट पिलर बांधले आहेत. येथील पादचारी पूल आणि जिन्याचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून मोरवाडी चौक ओलांडून जावे लागते किंवा रस्ता ओलांडून महापालिकेकडे जावे लागते. दरम्यान, सध्या पिंपरीतील पीसीएमसी ते निगडी या विस्तारणाचे काम चालू आहे. त्यासाठी पुन्हा खर्च करण्यात येत आहे. मात्र, अशा अर्धवट कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे. हा रॅम्प लवकर पूर्ण करावा, अशी मागणी होऊ लागली आहे.

...तर पुलाचे काम पूर्ण करणार
पादचारी पूल नसल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून मोरवाडी चौक ओलांडावा लागत आहे. मात्र, या अर्धवट कामामुळे चौकात आणखी बकालपणा वाढला आहे. मात्र याबाबत मेट्रो प्रशासन ठाम असून,  प्रवासी संख्या वाढल्यावर त्या पुलाचे काम करणार असल्याचा दावा मेट्रो प्रशासनाने केला आहे. पण, अजून किती प्रवासी वाढल्यानंतर हा पूल पूर्ण करणार आहे, याबाबत त्यांनी कोणती माहिती दिली नाही.

पिंपरी मेट्रो स्थानकात प्रवाशांची संख्या वाढल्यावर पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे. यापूर्वीच महापालिकेकडून जागा आम्ही ताब्यात घेतली आहे.
- हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest