लघुउद्योगांना वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात येणार असून, त्या प्रामुख्याने सोडवण्यात येणार आहेत. संबंधित तक्रार घेतली नसल्यास अथवा अटेंड न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. ही सेवा २४ तास सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे महावितरणचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांच्याकडे अद्ययावत यंत्रणेसाठी प्रस्तावही पाठवला असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे आणि सचिव जयंत कड यांनी दिली
महावितरणचा स्पाईन सिटी विभागांतर्गत जाधववाडी फिडर नव्याने सुरू करण्यात आलेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात लघुउद्योजकांना महावितरणविषयी भेडसावणाऱ्या विविध समस्या व वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या संचालक मंडळासह महावितरण अभियंता व अधिकाऱ्यांसमवेत बैठकीचे आयोजन जाधववाडी चिखली येथे करण्यात आले होते.
या वेळी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, संदीप वहिले तसेच महावितरणतर्फे नवीन रुजू झालेले उपकार्यकारी अभियंता राजेश भगत, साहाय्यक अभियंता रामप्रसाद नरवडे, अतिरिक्त कार्यभार असलेले सिंह आणि जाधववाडी, चिखली, कुदळवाडी या औद्योगिक परिसरातील लघुउद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
या बैठकीत मुख्य वाहिनीला (एच टी) काही अडचण नसून एलटीला प्रॉब्लेम आहे असे निदर्शनास आले. बैठकीत १० रोहित्र बसवणे व त्यांचे मेंटेनन्स, फिडर पिलर मेंटेनन्स करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, लघुउद्योजकाने ७८७५७२५३७९ या फोनवर वीज संबंधित तक्रार केल्यानंतर तो त्वरित फोन घेऊन उत्तर देणे अनिवार्य आहे.
तसेच कोणतीही सबब न सांगता ते अटेंड करणे देखील महत्त्वाचे आहे. जर जनमित्र देखभाल दुरुस्ती करण्याबाबत व्यस्त असल्यास तर त्याच्यासोबत असलेल्या साहाय्यक जनमित्राने कॉल घेऊन खंडित वीजपुरवठ्याची तक्रार व पत्ता नोंद करून सोबत असलेल्या जनमित्राला देणे आवश्यक आहे. टाळाटाळ केल्यास अथवा तक्रार न घेतल्यास कडक कारवाई केली जाईल, असे उपकार्यकारी अभियंता राजेश भगत यांनी स्पष्ट केले.
इंद्रायणीनगर, स्पाईन सिटी, मोशी या तिन्ही विभागांना हे आदेश लागू होणार आहेत. तसेच, याबाबत प्रत्येक कर्मचाऱ्यांनी त्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांची पहिली पाळी सुरू झाली की जे कोणी जनमित्र ड्यूटीवर असतील त्यांनी ड्यूटीवर रुजू झाले की तक्रार ग्रुपवर नाव पाठवून ड्यूटीला कोण आहे याची कल्पना देणे आवश्यक राहणार आहे.
ही सेवा २४ तास सातही दिवस चालू राहील. लघुउद्योजकांनी याबाबत कोणतीही अडचण असल्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, स्पाईन सिटी हा नवीन विभाग बनवण्यात आल्यामुळे या ठिकाणी सीडी गाडी नाही. त्यासाठी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी मुख्य अभियंता राजेंद्रजी पवार यांच्याकडे प्रस्ताव त्वरित पाठवून मिळवून देण्याचे आश्वासन दिले.