सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्व्हर डाऊनमुळे ई- पॉस मशिन बंद आहेत. त्यामुळे काही काळ ऑफलाइन वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुन्हा आता ऑनलाइन वाटप सुरू झाले आहे. मात्र या वाटपामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. एकीकडे वारंवार बंद पडणारी मशिन आणि दुसरीकडे दुकानचालकांची मनमानी यामुळे शहरातील लाभार्थी त्रस्त झाले आहेत. दुकान उघडण्याचा कालावधी कमी.
असल्याने धान्य मिळवण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत.
पिंपरी-चिंचवड शहरात २४८ स्वस्त धान्य वितरण दुकाने आहेत. शहरात १ लाख १० हजार स्वस्त धान्य दुकानांचे ग्राहक आहेत. यामध्ये अंत्योदय आणि अन्न सुरक्षा योजनेत असलेल्या लाभार्थींना धान्याचा पुरवठा केला जातो. दर महिन्याला साधारणतः १५ हजार क्विंटल धान्याचे वितरण केले जाते. यात सहा हजार क्विंटल गहू आणि नऊ हजार क्विंटल तांदूळ वाटप केले जाते. गेल्या महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानांमध्ये सर्व्हर डाऊनमुळे ई-पॉस मशिन बंद आहेत. अनेक तांत्रिक अडचणी येत असल्याने अखेर दुकानचालकांनी ऑनलाइन धान्य देणे बंद केले होते. त्यानंतर ऑफलाइन धान्य देण्याबाबत सूचना केल्या. मात्र या गोंधळामुळे मूळ लाभार्थी वंचित राहिला आहे.
धान्य वितरण व्यवस्था कोलमडली आहे. गेल्या महिन्याचे धान्य अजूनही काही ग्राहकांना मिळालेले नाही. या महिन्याचे धान्य वाटप काही ठिकाणी सुरू झाले आहे, तर काही ठिकाणी अजूनही बाकी आहे. सध्या चिखली, भोसरी, काळेवाडी, पिंपरी या परिसरातील काही दुकानचालकांशी संपर्क साधल्यानंतर जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे धान्यवाटप सुरू असल्याचे सांगण्यात आले. त्यात मोठा गोंधळाने परिमंडळ अधिकारी, रास्त दुकानदार आणि मूळ लाभार्थी यांचा समन्वय नसल्याने वाटपावर परिणाम झालेला आहे.
शासन निर्णयानुसार स्वस्त धान्य दुकाने सकाळी चार तास आणि सायंकाळी चार तास सुरू ठेवणे बंधनकारक आहे. पण, शहरातील अनेक ठिकाणची दुकाने सायंकाळी उघडलीच जात नाहीत. त्याचप्रमाणे वारंवार बंद पडणारे सर्व्हर आणि दुकानचालकाची मनमानी यामुळे अनेक जण या धान्यापासून वंचित राहू लागले आहेत. त्यामुळे याची तक्रार नेमकी करायची कोठे, असा प्रश्न या लाभार्थ्यांना पडला आहे.
शहरातील पिंपरीमध्ये ७५, चिंचवडमध्ये ९० आणि भोसरी परिसरात ८३ दुकाने आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये दुकानांची संख्या घटल्याने लाभार्थ्यांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. तर शहरात जवळपास ६ हजार क्विंटल गहू तर, ९ हजार क्विंटल तांदूळ वाटप करण्यात येतो. मात्र, एकीकडे अन्नधान्य परिमंडळ कार्यालयाकडून बदलण्यात येणारे नियम आणि दुसरीकडे धान्य दुकानाची मनमानी यामुळे लाभार्थी अडचणीत सापडलेले आहेत.
सध्या वाटप व्यवस्थित सुरू आहे. सर्व्हर डाऊनची तक्रार नाही. नागरिकांनी स्वस्त धान्य वितरण करणाऱ्या दुकानांची तक्रार करावी. दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
- प्रशांत खताळ, साहाय्यक अन्नधान्य वितरण अधिकारी, चिंचवड व निगडी
गेल्या महिन्यात तांत्रिक अडचणीमुळे धान्य मिळू शकले नाही धान्य घेण्यासाठी दुकानात वारंवार फेऱ्या माराव्या लागल्या. मशिन बंद असल्याचे सांगून धान्य देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर, आता दोन्ही महिन्यांचे धान्य एकदम देण्याचे काम सुरू आहे.
- संध्या गायकवाड, ग्राहक
आम्ही ग्राहकांना सहकार्य करतो. सध्या दोन महिन्यांचे वाटप सुरू आहे. मशिनही व्यवस्थित चालते. अद्याप कोणत्याही ग्राहकाची तक्रार नाही. याबाबत परिमंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.
- विक्रम छाजेड, रास्त धान्य दुकानदार, चिखली