संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरातील मुळा नदीसुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. पवना व इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पांचे काम लवकरच सुरू करण्यात येईल. त्यासाठी अमृत योजनेतून निधी मिळणार असून, महापालिका म्युन्सिपल बॉण्डद्वारे व इतर माध्यमातून निधी उभारणार आहे, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी पत्रकारांना माहिती दिली.
महापालिका भवनात ते पत्रकारांशी बोलत होते. आयुक्त सिंह म्हणाले की, मुळा नदीसुधार प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे वाकड ते सांगवी पुलापर्यंतचे काम सुरू झाले आहे. त्यात नदीकडेने प्रथम ड्रेनेजलाईन टाकून ते सांडपाणी शुद्धीकरण केंद्रास जोडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, प्रायोगिक तत्त्वावर एका भागाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. पवना नदी शहराच्या मध्य भागातून वाहते. शहराला पावसाळ्यात सर्वाधिक फटका पवना नदीच्या पुराचा बसतो. त्यामुळे चिपळूण व महाडच्या धर्तीवर राज्य शासनाने पूरग्रस्त शहर म्हणून आपत्त्कालीन निधीतील ५८० कोटी रुपये महापालिकेस द्यावेत, अशी मागणी सरकारकडे केली आहे. या प्रकल्पाचा खर्च मोठा असल्याने इतर पर्यायांवर विचार सुरू आहे. तसेच, म्युन्सिपल बॉण्ड काढून निधी उभारण्याचा विचार सुरू आहे. या प्रकल्पास पर्यावरण विभागाची ई. सी. (इन्व्हायमेंट क्लेरेन्स) दाखला लवकरच मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष काम सुरू केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पास अमृत योजनेत राज्य सरकारकडून मान्यता मिळाली आहे. प्रकल्पासाठी निधी मंजूर झाल्यानंतर प्राधान्याने काम सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.