पिंपरी-चिंचवड : पाच सहायक आयुक्तांवर बदलीची टांगती तलवार

लोकसभा निवडणूक पारदर्शक, मुक्त व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पुणे जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ असणाऱ्या अधिका-यांच्या तत्काळ बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Amol Warankar
  • Sun, 24 Mar 2024
  • 03:06 pm
PCMC

पाच सहायक आयुक्तांवर बदलीची टांगती तलवार

लोकसभा निवडणूक पारदर्शक, मुक्त व भयमुक्त वातावरणात होण्यासाठी पुणे जिल्ह्यात तीन वर्षापेक्षा अधिक काळ असणाऱ्या अधिका-यांच्या  तत्काळ बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार  पिंपरी-चिंचवड महापालिकेत (PCMC) तीन वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारे आणि जिल्ह्यात असणारे पाच सहायक आयुक्त हे बदलीस पात्र आहेत. मात्र, त्या अधिका-यांच्या बदल्या कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी लोकसभा निवडणुका योग्य पद्धतीने पार पडाव्यात म्हणून अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बदलीस पात्र असणाऱ्या सहायक आयुक्तांची माहिती शासनाच्या नगरविकास विभागाने मागवली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच देशभरातील विविध राज्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्यांचा किंवा गृह केडर असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर आता मुख्याधिकारी केडरच्या सहायक आयुक्तांची माहिती नगर विकास विभागाकडून मागविण्यात आली आहे. महापालिकेत राज्य सेवेतील सध्या बारा सहायक आयुक्त कार्यरत आहेत. त्यापैकी पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

विनोद जळक, विजयकुमार थोरात, सुषमा शिंदे, नीलेश देशमुख, यशवंत डांगे, उमेश ढाकणे, किरणकुमार मोरे, पूजा दुधनाळ, सुचिता पानसरे, शीतल वाकडे, अमित पंडित, अंकुश जाधव हे सर्व सहायक आयुक्त आणि प्रशासन अधिकारी म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यरत आहेत.

महापालिका आस्थापनेवर कार्यरत असणा-या मुख्याधिकारी संवर्गातील अधिका-यांच्या मूळ सेवा नोंद पुस्तकांत स्व- जिल्हा कोणता आहे, त्यांची माहिती नमूद करावी. सध्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांचा पुणे जिल्ह्यात रुजू झाल्याचा दिनांक याबाबतची माहिती राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे कळविण्यात येत आहे.

- विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग, पिंपरी महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest