Pimpri-Chinchwad : रस्तोरस्ती दादा, भाऊ, शेठचेच दर्शन; आचारसंहिता लागून ४८ तास उलटल्यावरही फ्लेक्स, फलक निघेनात; प्रशासनाकडून कारवाईचा केवळ देखावा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौकाचौकात आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 18 Oct 2024
  • 03:02 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवड: केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करून ४८ तास झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही पिंपरी, चिंचवड आणि भोसरीच्या विधानसभा मतदारसंघात विविध रस्त्यांवर, चौकाचौकात, गल्लोगल्ली लावण्यात आलेले राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक ‘जैसे थे’ आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यावर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाला शहरभर लावण्यात आलेले बेकायदा फ्लेक्स काढताना दमछाक होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांचे जाहिरात फलक चौकाचौकात आणि महत्त्वाच्या रस्त्यांवर लावण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून इच्छुकांनी देखील चमकोगिरी केली आहे. शहरात सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाकडून बेकायदा बॅनर, फ्लेक्स लावले आहेत. प्रत्येक विद्युत पोल, सिग्नल, चौकात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स भरगच्च झाला आहे. महापालिकेतील सत्ताधारी पक्षासह सर्वच पक्षांचे बॅनर-फलक लागले आहेत. शहरात मुख्य व अंतर्गत रस्ते, चौका-चौकात, सिग्नल, शाळा-काॅलेज परिसर अशा प्रत्येक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स लागले होते.

विधानसभेची आचारसंहिता सुरू झाल्यानंतर शहरभर लावण्यात आलेल्या या राजकीय पक्षाच्या बेकायदा फ्लेक्सवर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, आकाशचिन्ह विभागासह क्षेत्रीय कार्यालयाकडून कारवाईचा वेग पाहता हे फ्लेक्स कधी काढणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या महसुलावर पाणी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुतांश राजकीय पक्षाच्या इच्छुकांकडून जागोजागी फ्लेक्स, फलक लावण्यात आलेले आहेत. विधानसभा मतदारसंघात स्वतःच्या नावाची चर्चा व्हावी यासाठी तीर्थयात्रा, आरोग्य शिबिर, दिवाळी फराळ वाटप यासह अन्य प्रकारचे उपक्रम घेतले जात आहेत. हे फ्लेक्स लावताना महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नसल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर देखील परिणाम झाला आहे. काही चौकांमध्ये तर मोठ्या आकारातील हे बेकायदा जाहिरात फलक लावण्यात आल्याने वाहतूक नियंत्रण दिवे तसेच माहितीचे फलकदेखील झाकून गेले आहेत.

शहरातील सर्व राजकीय व अन्य बेकायदा जाहिरातींचे सर्व फलक गुरुवारी सायंकाळपर्यंत काढून टाकण्यात यावेत. याबाबतच्या सूचना आकाशचिन्ह विभागाच्या उपायुक्तांसह क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्वच प्रभागात फ्लेक्स, फलक काढण्यात येत आहेत.
- चंद्रकांत इंदलकर,  अतिरिक्त आयुक्त, महापालिका

शासनाच्या पत्राला केराची टोपली
निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भावी आमदार असलेल्या इच्छुकांची चमकोगिरी सुरू होती, तर विद्यमान आमदारांनी गल्लोगल्ली विकास कामांचा पाढा वाचून दाखवत फ्लेक्स, बॅनर लावून टेंभा मिरवत नागरिकांवर प्रभाव पाडला होता. गणेशोत्सव, नवरात्र, दांडिया, दसरा, आता  दिवाळी सण-उत्सवात  राजकीय पक्षांनी शहरभर अनधिकृत बॅनर, पोस्टर्स व होर्डिंग लावून शहर विद्रुप केले आहे. यावर महापालिकेने या बॅनरवर कोणतीही कारवाई केलेली नाही. उत्सवकाळात जागोजागी लागलेल्या या बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण झाल्याने महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचे दर्शन लोकांना घडले. या बेकायदा बॅनरमुळे पालिकेचा लाखो रुपयांचा जाहिरात करही बुडाला आहे. दरम्यान, शहर विद्रुपीकरणवर महापालिका आयुक्तांना शासनाच्या नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे पत्र पाठवून सर्व बॅनर्स, फ्लेक्स हटवण्यात यावेत, याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पण, महापालिकेने त्या पत्राला केराची टोपली दाखवली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest