पिंपरी-चिंचवड : अखेर 'ठाण'बहाद्दरांच्या होणार बदल्या

महापालिकेच्या विविध आस्थापनांवरील विभाग प्रमुखांच्या मर्जीतील कर्मचारी हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत.

पिंपरी-चिंचवड : अखेर 'ठाण'बहाद्दरांच्या होणार बदल्या

'सीविक मिरर'च्या वृत्ताची दखल घेत मर्जीतील कर्मचारी-अधिकाऱ्यांची आयुक्तांनी मागवली माहिती

महापालिकेच्या विविध आस्थापनांवरील विभाग प्रमुखांच्या मर्जीतील कर्मचारी हे वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्यांकडे दुर्लक्ष केल्याचे वृत्त २९ जुलिया रोजी 'सीविक मिरर'मध्ये  'ठाण'बहाद्दरांच्या बदल्या कधी?' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले. या वृत्ताची दखल घेत आयुक्त शेखर सिंह यांनी दखल घेत ८ आॅगस्टपर्यंत बदलीस पात्र असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील विभाग प्रमुखाच्या मर्जीतील अधिकारी, कर्मचारी हे वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे लागेबांधे तयार होवून अर्थपूर्ण वाटाघाटी वाढू लागल्या आहेत. यामध्ये स्थापत्य, आरोग्य, वैद्यकीय, करसंकलन, भांडार, उद्यान यासह अन्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिका सेवेतील ‘वर्ग- अ’ ते ‘ड’पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्या करणे अपेक्षित असते. मात्र, लोकसभा निवडणुका असल्याने त्यांच्या बदल्या होवू शकल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या विविध विभागांत कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, मुख्य लिपिक, लिपिक, सहायक भांडारपाल, लेखापाल, उपलेखापाल यासारख्या पदांवर अनेक वर्षे ठाण मांडून बसलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना  आता बदल्या होणार नाही, असे वाटत होते.

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी विभागातील गट 'अ' ते गट 'ड' मधील जे अधिकारी व कर्मचारी हे एप्रिल व मे २०२४ या महिन्यात बदलीस पात्र ठरतात. त्यांची यादी व ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैयक्तिक, वैद्यकीय कारणास्तव बदलीचे अर्ज द्यायचे असतील. असे अर्ज हे ८ आॅगस्ट पर्यंत विभाग प्रमुखांकडून सामान्य प्रशासनाकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असेही शेखर सिंह यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे.

Share this story

Latest